मुंबईत ‘बिहार भवन’ हवेय? मग पाटण्यात ३० मजली ‘महाराष्ट्र भवन’ बांधू द्या! संजय राऊतांनी नितीश कुमार सरकारला ठणकावले
‘मुंबईवरच आक्रमण का?’ राऊतांचा सवाल; अदानींकडून बाजारभावाने जमीन घेण्याचाही दिला सल्ला
मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबईत ‘बिहार भवन’ उभारण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून बिहारच्या मंत्र्यांना खडे बोल सुनावले असून, “जर मुंबईत बिहार भवन हवे असेल, तर बिहार सरकारनेही पाटण्यातील मोक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र भवनसाठी ५ ते ६ एकर जागा द्यावी,” अशी आक्रमक अट घातली आहे. “तुम्ही मुंबईत जागा मागता, मग आम्ही पाटण्यात ३० मजली महाराष्ट्र भवन उभारू,” अशा शब्दांत राऊतांनी बिहार सरकारला ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे.
नेमका वाद काय?
बिहार सरकारने मुंबईतील एलिफिन्स्टन इस्टेट परिसरात ‘बिहार भवन’ उभारण्यासाठी ३१४ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. यावरून मनसे आणि ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असतानाच, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी “राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का?” असे आव्हान देणारे वक्तव्य केले होते. या विधानाने वादात तेल ओतले असून, संजय राऊत यांनी बिहारच्या मंत्र्यांच्या भाषेचा तीव्र निषेध केला आहे.
‘अदानींकडून जमीन विकत घ्या’
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मुंबईची सध्याची अवस्था समजून घ्या. तुम्हाला जर जागा हवीच असेल, तर ती गौतम अदानींकडून बाजारभावाने विकत घ्या. सरकारकडून सवलतीच्या दरात जागा हवी असेल, तर आधी सांस्कृतिक देवाणघेवाण करा. मुंबईची जमीन काही तुम्ही पाटण्यातून आणणार नाही, ती आमचीच आहे.” संविधानाचा हवाला देणाऱ्या बिहारच्या नेत्यांना राऊतांनी सुनावले की, “आम्हीही संविधान मानणारे लोक आहोत, पण मुंबईत विनाकारण वातावरण बिघडवणारी विधाने करू नका.”
पाटण्यात ३० मजली महाराष्ट्र भवनची मागणी
संजय राऊत यांनी या वादात आता ‘महाराष्ट्र भवन’चा मुद्दा उपस्थित केला आहे. “महाराष्ट्रातील असंख्य लोक बिहारला आणि पाटण्याला जातात. ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईत हक्काने जागा मागता, त्याचप्रमाणे बिहार सरकारने पाटण्यातील गोला रोड किंवा न्यू पाटलीपुत्र कॉलनी सारख्या मोक्याच्या ठिकाणी महाराष्ट्राला जागा द्यावी. तिथे आम्ही ३० मजली भव्य महाराष्ट्र भवन उभारू. ही खरी सांस्कृतिक देवाणघेवाण होईल,” असे राऊत म्हणाले.
‘मुंबईवरच आक्रमण का?’
“जर बिहारी बांधव आमचे असतील, तर मराठी बांधवांनाही तुम्ही तिथे स्वीकारले पाहिजे. फक्त मुंबईवरच अशा प्रकारे आक्रमण का केले जाते?” असा सवाल करत राऊतांनी या प्रकरणाला आता राष्ट्रीय वळण दिले आहे.
बिहार सरकार आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षांमधील हा ‘कलगीतुरा’ आता कोणत्या थराला जातो आणि राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




