टॉप स्टोरी राजकारण

शर्टाचं वरचं बटन आता कधीच लावणार नाही…’; काकांच्या आठवणीने रोहित पवार विधानसभेत ढसाढसा रडले

मुंबई, विशेष प्रतिनिधी :”अजितकाका नेहमी मला सांगायचे, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात त्या कमी कर आणि शर्टाचं वरचं बटन नेहमी लावत जा… पण आता हे सांगायला काका उरले नाहीत. त्यांची आठवण म्हणून मी आता शर्टाचं ते बटन कधीच लावणार नाही,” अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अजित पवार यांच्या निधनानंतर मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावर बोलताना पुतण्या आणि काका यांच्यातील नात्याचा एक हळवा कोपरा उभ्या महाराष्ट्राने अनुभवला.

आरोपांचे गाठोडे समुद्रात बुडवा!

रोहित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विशेष आवाहन केले. ते म्हणाले, “काका कायम स्वच्छतेचे भोक्ते होते, पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक डाग उडवले गेले. जे कधीच सिद्ध झाले नाहीत. फडणवीस साहेब, तुम्ही काकांचे जिवलग मित्र होता. आता काका आपल्यात नाहीत, तेव्हा त्यांच्यावरील या बिनबुडाच्या आरोपांचे गाठोडे अरबी समुद्रात बुडवून टाका, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

अपघाताच्या चौकशीवरून आक्रमक पवित्रा

अजितदादांच्या अपघाती निधनाबाबत बोलताना रोहित पवारांच्या स्वरात आक्रमकता जाणवली. “काकांच्या अपघाताला जो कोणी जबाबदार असेल, तो कितीही मोठा असला तरी त्याला तुरुंगात धाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, सुनेत्रा काकींच्या पुढील राजकीय प्रवासात आपण एक पुतण्या म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पवारांनी मुलासारखं वाढवलं, नियतीने मुख्यमंत्रीपद हिरावले!

अजितदादांच्या ४० वर्षांच्या राजकीय तपस्येचा उल्लेख करत रोहित पवार म्हणाले की, “लहानपणी वडील गेल्यानंतर शरद पवार साहेबांनी काकांना पोटच्या मुलासारखे सांभाळले आणि वाढवले. ६६ वर्षे ६ महिने ६ दिवस अशा वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. जर नियतीने त्यांना थोडी साथ दिली असती, तर ते निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. बाहेरून फणसासारखे कडक वाटणारे काका आतून मात्र अत्यंत रसिक होते; त्यांना जुनी गाणी आणि चित्रपटांची मोठी आवड होती.”

आपल्या भाषणाच्या शेवटी, “मी काकांच्याच स्टाईलने यापुढे महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहीन,” असा निर्धार व्यक्त करत रोहित पवार यांनी आपल्या लाडक्या काकांना जड अंतःकरणाने निरोप दिला.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *