टॉप स्टोरी राजकारण

‘आयुष्यभर टायमिंग पाळणाऱ्या दादांनी चक्क मृत्यूचं टायमिंग चुकवलं’; फडणवीसांच्या भाषणाने विधानसभेचे डोळे पाणावले

मुंबई, विशेष प्रतिनिधी :”अजितदादा म्हणजे केवळ राजकीय सहकारी नव्हते, तर ते अंतःकरणातून प्रेम करणारे माझे जिवलग मित्र होते. आयुष्यभर वेळेचे काटेकोर पालन करणाऱ्या दादांनी आयुष्याच्या अंतिम क्षणी मात्र पहिल्यांदाच टायमिंग चुकवले. मुख्यमंत्रीपदाची पूर्ण क्षमता असणारे अजितदादा हे महाराष्ट्राला कधीही न लाभलेले एक उत्तम मुख्यमंत्री होते,” अशा अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांच्या आठवणींचा बांध फुटला आणि संपूर्ण सभागृह सुन्न झाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, “दादा सभागृहात पूर्णवेळ बसणारे नेते होते. यावर्षी ते आपला १२ वा अर्थसंकल्प मांडणार होते आणि पुढच्या वर्षी बॅ. शेषराव वानखेडे यांचा विक्रम मोडीत काढण्याच्या उंबरठ्यावर होते. मात्र, नियतीने तो योग हिरावून नेला. ‘लाडकी बहीण’ योजनेचा भार तिजोरीवर पडेल असे वित्त विभागाने म्हटले होते, तरीही दादांनी ठाम राहून ही योजना मंत्रिमंडळात मंजूर करून घेतली. त्यानंतर सुरू झालेला त्यांचा ‘गुलाबी जॅकेट’चा प्रवास आणि त्यांनी आम्हालाही ते घालायला लावलेले पाहून त्यांच्यातील उत्साही मित्र दिसायचा. एका सच्च्या मित्राचा असा आकस्मिक मृत्यू होणे ही मनाला न संपणारी वेदना देणारी गोष्ट आहे.”

२०१९ मधील पहाटेच्या शपथविधीच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले, “दादा शब्दाचे पक्के होते. जेव्हा त्यांच्या वरिष्ठांनी निर्णय बदलला, तेव्हा दादांनी ‘मी दिलेला शब्द मोडणार नाही’ अशी भूमिका घेतली आणि माझ्यासोबत शपथ घेतली. त्यासाठी त्यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागली, पण त्यांनी तत्त्वांशी तडजोड केली नाही. ते ‘पॉलिटिकली करेक्ट’ राहणाऱ्यांपैकी नव्हते, जे मनात असायचे तेच त्यांच्या ओठावर असायचे. मी विरोधी पक्षनेता असतानाही ते मला आग्रहाने ‘मुख्यमंत्री’ म्हणूनच हाक मारायचे आणि पुढे त्यांचे ते शब्द खरे ठरले.”

मैत्रीतील हळवे कोपरे उलगडताना फडणवीस म्हणाले की, “आमचा दोघांचा जन्म २२ जुलैचाच. ते माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे असल्याने ते खऱ्या अर्थाने माझे मोठे भाऊच होते. २७ तारखेला मंत्रिमंडळ आणि पायाभूत सुविधांच्या बैठकीनंतर आम्ही अँटीचेंबरमध्ये सुमारे ४० मिनिटे मनमोकळ्या गप्पा मारल्या. तीच भेट आमची शेवटची ठरेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. रोज हळदीचे दूध पिणारे आणि आरोग्याची काळजी घेणारे दादा इतक्या लवकर जातील, यावर आजही विश्वास बसत नाही.” शेवटी, सुनेत्रा वहिनींना पाठबळ देताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, त्या दादांची प्रतिमा आणि कार्य समर्थपणे पुढे नेतील. “दुसरे अजितदादा आता होणे शक्य नाही, ही पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात कायम राहील,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राला निरोप दिला.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *