‘दादांचा निरोप घेणं हा काळाचा क्रूर थट्टा आहे’; विधानसभेत भुजबळांनी उलगडला ४० वर्षांच्या मैत्रीचा प्रवास
मुंबई, विशेष प्रतिनिधी :”ज्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून अनेक राजकीय लढाया लढल्या, त्याच अजितदादांसाठी आज शोकप्रस्ताव मांडावा लागत आहे, हे पाहून मन सुन्न झाले आहे,” अशा शब्दांत राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या. १९८५ पासूनचा प्रदीर्घ संसदीय काळ पाहिलेल्या भुजबळांना आज अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना आपला हुंदका रोखणे कठीण झाले होते.
नियतीने घातलेला घाला
भुजबळ म्हणाले की, “राजकारणात शरद पवार साहेबांचा वारसा पुढे नेत असताना दादांनी स्वतःची एक वेगळी आणि करारी ओळख निर्माण केली होती. अनेकदा आम्ही दिग्गजांना निरोप दिला, पण दादांच्या निधनाची बातमी पचवणे आजही अशक्य वाटते. सभागृहात ते कधीही पक्षभेद करत नसत; उलट विरोधकांच्या कामांनाही तेवढेच महत्त्व देऊन ते मार्गी लावत असत. प्रशासनावर अशी जरब असलेला नेता आज आपल्यात नाही, यावर विश्वासच बसत नाही.”
प्रशासनाचा चालता-बोलता विद्यापीठ
अजितदादांच्या कामाच्या शिस्तीचा उल्लेख करताना भुजबळ यांनी त्यांना एक ‘आधारवड’ म्हणून संबोधले. “वक्तशीरपणा आणि कामातील स्पष्टता हा दादांचा दागिना होता. त्यांच्या जाण्याने केवळ एका पक्षाचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. एक असा नेता ज्याची नजर फाईलवर पडली की प्रश्नाचं मूळ चटकन सापडायचं, असा प्रशासकीय जाणकार आता होणे नाही,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पोरका झालेला महाराष्ट्र
अजितदादांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असे सांगताना भुजबळांनी त्यांच्या निधनाने महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पोरका झाल्याची भावना व्यक्त केली. विधानसभेतील या शोकप्रस्तावावेळी भुजबळांच्या शब्दांनी सभागृहातील वातावरण अधिकच भावूक झाले होते, जणू प्रत्येक आमदाराच्या मनात दादांच्या त्या आक्रमक पण प्रेमळ स्वभावाच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या.
—
Deepak Kaitke




