सत्तेसाठी साजिश की लोकशाहीवर हल्ला? फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा कट उघड, स्टिंग ऑपरेशनने महाराष्ट्र हादरला
विशेष प्रतिनिधी:राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार ऐन शिगेला असताना, महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का देणारा एक स्फोटक आणि अस्वस्थ करणारा खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी सुनियोजित कट रचण्यात आल्याचा धक्कादायक दावा स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाला आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल थेट राज्याच्या गृहविभागाकडे सादर करण्यात आल्याने, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ही केवळ आरोपांची राजकीय जुगलबंदी नसून, राज्यातील सत्तासंघर्षात संविधानिक पदांवर असलेल्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा गंभीर प्रयत्न तर नाही ना, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये एक खळबळजनक बातमी समोर आली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्या वेळचे मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र शिजत असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता. त्यावेळी विरोधकांनी या बातमीवर संशय व्यक्त केला होता. मात्र आता या आरोपांना अधिकृत तपास अहवालाने दुजोरा दिल्याचं चित्र समोर आलं आहे.
निवृत्त डीजीपींच्या अहवालातून धक्कादायक पर्दाफाश
महाराष्ट्राच्या निवृत्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्य गृह विभागाला सादर केलेल्या विशेष चौकशी अहवालात हा गंभीर दावा नमूद करण्यात आला आहे. 2016 च्या कथित ULC घोटाळ्याच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना गोवण्याचा कट रचण्यात आल्याचं अहवालात स्पष्ट केलं आहे.
या कटाचा सूत्रधार म्हणून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचं नाव पुढे आलं आहे. हा दावा समोर येताच प्रशासन, राजकारण आणि पोलीस दलात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
SIT, स्टिंग आणि न्यायालयात सादर पुरावे
या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलं होतं. या समितीत तत्कालीन डीआयजी राजीव जैन, डीसीपी नवनाथ ढवळे आणि एसीपी जादिकराव पोळ यांचा समावेश होता.
या समितीने मुंबई उच्च न्यायालयात एक पेन ड्राइव्ह सादर केली असून, त्यामध्ये संबंधित स्टिंग ऑपरेशनचे तपशील असल्याचा दावा करण्यात आला आहे. या स्टिंगमध्ये फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आखलेल्या डावपेचांचा तपशील असल्याचे समोर येत आहे.
ऐन निवडणुकीत पेटले राजकारण
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण उघड झाल्याने राज्यात आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता असून, “राजकीय सूडबुद्धीतून राज्यातील सर्वोच्च पदांवरील नेत्यांनाच संपवण्याचा प्रयत्न झाला का?” हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
हा केवळ एका नेत्याचा विषय राहिलेला नाही. हा प्रश्न लोकशाहीच्या आरोग्याचा, पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेचा आणि सत्तेच्या मर्यादांचा आहे. या स्फोटक खुलाशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या वादळाची नांदी झाली असून, पुढील काही दिवस हे प्रकरण निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार, हे निश्चित आहे.




