मुंबई महाराष्ट्राची नाही? निवडणुकीआडून ओळख पुसण्याचा डाव, अण्णामलाईंच्या विधानाने रण पेटलं
विशेष प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना भाजपने प्रचारासाठी बाहेरच्या राज्यांतील नेत्यांची फौज उतरवली आणि त्याच क्षणी मुंबईच्या अस्मितेशी थेट खेळ सुरू झाला. उत्तर प्रदेश, बिहारनंतर थेट तामीळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई मुंबईत अवतरले. वॉर्ड क्रमांक 47 मधील प्रचारात त्यांनी जे उच्चारले, त्याने केवळ राजकीय तापमान वाढवले नाही, तर मराठी अस्मितेवर उघड हल्लाच चढवला.
एका मुलाखतीत अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख “बॉम्बे” असा करत थेट विधान ठोकले—“बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी.” पुढे त्यांनी मुंबई हे महाराष्ट्रातील शहरच नाही, तर एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याचा दावा केला. हा केवळ शब्दांचा घोळ नव्हता; तर राज्याच्या इतिहासाला, लढ्यांना आणि बलिदानांना नाकारण्याचा प्रयत्न असल्याची भावना सर्वत्र पसरली.
इतक्यावरच न थांबता, अण्णामलाईंनी “ट्रिपल इंजिन सरकार”चा राजकीय नारा दिला. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भाजपचा महापौर—अशी सत्तेची मांडणी करत त्यांनी चेन्नई, बंगळुरू, हैदराबादची उदाहरणे दिली. मात्र, सत्तेच्या या गणितात मुंबईचा आत्मा कुठे आहे, असा सवाल मराठी जनतेने उपस्थित केला.
या वक्तव्याने शिवसेना आक्रमक झाली. “शेवटी पोटातले ओठांवर आलेच,” असा थेट आरोप करत शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी भाजपवर तोफ डागली.
“निवडणुका गेल्या तेल लावायला, पण मुद्दामहून अशा बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका. मुंबादेवीच्या मुंबईला पुन्हा कुणी ‘बॉम्बे’ म्हणत मराठी माणसाला हिणवले, तर मराठी माणसाशी थेट गाठ आहे,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
चित्रे यांनी ठणकावून सांगितले की, शहरांची नावे ही केवळ नकाशावरची अक्षरे नसतात; ती भाषा, संघर्ष, आंदोलन आणि स्वाभिमानाचे रक्तात मुरलेले प्रतीक असतात. “मुंबई म्हणजे मुंबईच! बॉम्बे नाही. आणि मुंबई ही महाराष्ट्राचीच!” असा दणदणीत निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत विकास, भ्रष्टाचार, पाणी, रस्ते असे मुद्दे असतानाच, एका विधानाने संपूर्ण प्रचाराची दिशा बदलली आहे. हा प्रश्न आता महापालिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही; तो मुंबई कोणाची, तिच्या नावाचा, तिच्या ओळखीचा आणि तिच्या आत्म्याचा बनला आहे.
ही निवडणूक सत्तेसाठी आहे की अस्मितेसाठी—हा निर्णय आता मुंबईकरांच्या हातात आहे. आणि याच निकालावर मुंबईचा आवाज ऐकू येणार की दाबला जाणार, हे ठरणार आहे.




