टॉप स्टोरी महाराष्ट्र

राज्य ग्रंथालय परिषदेची १६ वर्षानंतर बैठक: ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी सहकार्य ; पाटील

मुंबई प्रतिनिधी:राज्यातील ग्रंथालय चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी नव्याने गठीत करण्यात आलेल्या ग्रंथालय परिषदेची तब्बल १६ वर्षांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार सुमारे १६ ते १७ वर्षांनंतर राज्य ग्रंथालय परिषद पुन्हा गठीत करण्यात आली आहे. नव्याने गठीत परिषदेची पहिली बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. या परिषदेची मागील बैठक २६ मे २००९ रोजी पार पडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा परिषदेची बैठक घेण्यात आली आहे.आता परिषदेच्या माध्यमातून ग्रंथालय चळवळ सक्षम करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालय व्यवस्थापनाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेण्यात येतील, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत ग्रंथालय संचालनालयाचे सन २००८-०९ ते २०२४-२५ या कालावधीतील वार्षिक अहवाल मंजुरीसाठी चर्चेला घेण्यात आले. याशिवाय बैठकीत विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान ग्रामीण भागात वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सीएसआर निधी किंवा राजाराम मोहनरॉय योजना यांच्या माध्यमातून मोबाईल वाचन व्हॅन खरेदी करून ती गावे, शाळा आणि दुर्गम भागांमध्ये नेऊन वाचन उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. गाव तिथे ग्रंथालय उपक्रम राबविण्यासाठी ग्रामविकास विभागाशी चर्चा करण्यात येईल, असे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.

संचनालयातंर्गत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि सहा विभागीय ग्रंथालयांमध्ये फिरते ग्रंथालय सेवा देणे ही योजना प्रायोगिक तत्त्वावर निर्माण करण्याचा मानस आहे. सार्वजनिक ग्रंथालयाचे नियतकालिक तीन वर्षानंतर तपासणी करण्यास मंजुरी देण्यात आली.तसेच ई-लायब्ररी, फिरते वाचनालय आदी विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

या बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अमोल मुत्याल, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, ग्रंथालय संघ अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, ग्रंथालय संघ मराठवाडा विभागाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, पुणे विभागाचे अध्यक्ष सोपान पवार, कोकण विभागाचे अध्यक्ष दिलीप कोरे,डॉ सिद्धी जगदाळे, डॉ सुभाष चव्हाण, सुनील वायाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *