टॉप स्टोरी महाराष्ट्र

भाजपच्या प्रचारसभांमध्ये महिलांचा नाच: शिवसेना ठाकरे गटाकडून व्हिडीओ व्हायरल

मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारसभेत महिलांना नाचवून गर्दी जमवली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अखिल चित्रे यांनी केला आहे. त्यांनी मंगळवारी यासंदर्भातील व्हिडीओ एक्स या समाज माध्यमातून व्हायरल करत भाजपवर निशाणा साधला आहे.

हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजप मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. आणि हे करताना भाजपच्या महाभागांना भान नाही की मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत. आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? असा सवाल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

बरं, या कार्यक्रमाच्या आयोजक कोण? तर भाजपचा स्थानिक उमेदवार आणि संयोजक कोण तर सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपने कोषाध्यक्ष नेमलेला पवन त्रिपाठी. ही असली माणसं आमच्या पवित्र मंदिरावर नेमताना लाज कशी वाटली नाही भाजपला ? मुंबईकरांनो आपल्या महापुरुषांचा असा अपमान सहन करायचा नाही. यांच्या डोक्यात चढलेली सत्तेची मस्ती उतरविण्याची संधी वारंवार येत नसते… यांना एकदाचा शिवटोला देऊयाच, असे आवाहनही चित्रे यांनी केले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *