शिक्षण, उद्योग आणि साहित्य यांचा अनोखा संगम असणाऱ्या शोभा मोरे या महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाचा विषय आहेत. प्राथमिक शिक्षक असलेले वामनराव काकडे आणि व्यावसायिक असणाऱ्या सुभद्रा काकडे यांच्या शिस्तबद्ध, संस्कारमय आणि शैक्षणिक संपन्नतेने नटलेल्या कुटुंबात शोभा मोरे यांचा जन्म झाला. कुटुंबाकडून मिळालेली शिक्षणाची बीजे त्यांच्या मनात रुजली. आपल्या पायावर उभे राहत असतानाच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करावे, या आईच्या शिकवणुकीत त्यांना पती श्रीकांत मोरे आणि सासरे सदाशिव मोरे यांची भक्कम साथ लाभली.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये कार्यरत असताना लोकांमध्ये आर्थिक गुंतवणुकीची शिस्त, बचत गटांच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरण आणि साहित्य संमेलनांच्या माध्यमातून दुर्लक्षित गुणवंत कवी व साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्याकडून घडत आहे.
शिक्षणाधिकारी असलेले शोभा यांचे सासरे सदाशिव रामचंद्र मोरे यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी जवळून अनुभवल्या. त्यामुळे सामान्यांना सुलभ व्याजदरात कर्ज मिळावे आणि कर्जासाठी होणारी धडपड कमी व्हावी, या हेतूने त्यांनी स्वतःची बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पती श्रीकांत मोरे हे सहकार खात्यात असल्याने त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून मनोरमा सहकारी बँकेची स्थापना केली.
त्यांची सासू मनोरमा मोरे यांच्या नावाने ९ मे १९९७ रोजी सुरू झालेल्या मनोरमा सहकारी बँकेचा प्रवास अखंड सुरू असून, शोभा मोरे या सेवानिवृत्तीनंतर मनोरमा मल्टिस्टेटच्या चेअरमन आहेत. या प्रवासात नैतिक अधिष्ठान जपत जनसामान्यांना व दुर्बल घटकांना कमी परताव्यात कर्ज कसे देता येईल, यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. काटकसर, बचतीचे महत्त्व आणि बचत गटांच्या माध्यमातून शेकडो लोक या बँकेशी जोडले गेले असून आज या बँकेचा व्यवसाय १००० कोटींपर्यंत पोहोचला आहे.
सासरे शिक्षणाधिकारी असल्यामुळे त्यांना मनापासून वाटत होते की अर्थकारणातून लक्ष्मीची पूजा तर होतेच, पण त्याला सरस्वतीच्या अधिष्ठानाची जोड देणेही आवश्यक आहे. याच विचारातून शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये दडलेल्या साहित्यिक सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी २००२ साली सोलापूर येथे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे पहिले साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.
या संमेलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला आणि सातशे ते आठशे साहित्यप्रेमींनी उपस्थिती दर्शवली. जिल्हा व राज्य पातळीवरील तज्ज्ञ साहित्यिक या संमेलनात सहभागी झाले होते. या उपक्रमाची दखल महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखेने घेतली आणि त्यातून महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) ची स्थापना झाली. मनोरमा साहित्य मंडळाचा प्रवास अखंड सुरू असून आतापर्यंत ११ साहित्य संमेलने यशस्वीरीत्या संपन्न झाली आहेत.
दर दोन वर्षांनी साहित्य संमेलने आयोजित केली जातात आणि दरवर्षी साहित्यिकांना पुरस्कार प्रदान केले जातात. या संमेलनांतून कवी संमेलने, मराठीचा जागर, चर्चासत्रे आणि मार्गदर्शक मुलाखती घेतल्या जातात. या संमेलनांचा परीघ विस्तारत असून केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर कर्नाटक, गोवा व गुजरात येथूनही तज्ज्ञ साहित्यिक सहभागी होत आहेत.
प्रत्येक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून हे अवघड कार्य लीलया पेलणाऱ्या शोभा मोरे अभिमानाने सांगतात की, आतापर्यंत ज्या साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष म्हणून बोलावण्यात आले, ते पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आणि नागपूरचे डॉ. रविंद्र शोभणे यांचा त्या विशेष उल्लेख करतात.
या साहित्यिक प्रवासात सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू इरेश स्वामी, कवी माधव पवार, कर्नाटक येथील रत्नाजी आगवणे, कोल्हापूरचे प्रा. चंद्रकुमार नलगे आणि नांदेडचे श्रीकांत देशमुख अशा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांना मनोरमा साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
साहित्य संमेलनांच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देतानाच शोभा मोरे यांनी सर्वसामान्यांसाठी आर्थिक साक्षरता आणि बचत गटांद्वारे स्त्री सक्षमीकरणाची धुरा समर्थपणे सांभाळली. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यरत असताना त्यांनी दैनंदिन अनुभवातून सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. आर्थिक गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी, ठेवींना नामनिर्देशन (नॉमिनेशन) असणे, तसेच आर्थिक व्यवहार करताना आवश्यक दक्षता याबाबत त्या मार्गदर्शन करत.
कोरोना काळात त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझी बँक’ हा आर्थिक साक्षरतेचा उपक्रम राबविला. यासोबतच त्या महिला बचत गटांचे संचालन करतात. या माध्यमातून महिलांचा आर्थिक, बौद्धिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या तीन नर्सऱ्या असून त्या बचत गटांना चालवण्यासाठी दिल्या आहेत.
गायी खरेदी, मिरची कांडप, मंगल कार्यालय यांसारख्या सामूहिक व्यवसायांसाठी कर्जपुरवठा केला जातो. शेतात खुरपणी किंवा खत घालण्याच्या कामांसाठी बचत गटांचे सहकार्य घेऊन महिलांना उत्पन्न मिळवून दिले जाते. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमधून महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित केले जाते, तसेच आर्थिक साक्षरतेचे धडे दिले जातात.
यावर्षी सायबर सिक्युरिटीविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार असून यासाठी मनोरमा फाउंडेशनमार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. या सेवाभावी कार्यात डॉक्टर असलेला मुलगा, मुलगी व जावई निशुल्क आरोग्यसेवा देऊन सक्रिय सहभाग घेतात.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कार्य पाहणारे आणि सहकार क्षेत्रातून निवृत्त झालेले श्रीकांत मोरे साहित्य संमेलनाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांचे भक्कम पाठबळ असल्याचे शोभा मोरे सांगतात. मोरे दाम्पत्यांच्या आयोजन व नियोजनात त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा असून, त्यामुळेच मनोरमा साहित्य पुरस्कार देशभरात प्रसिद्ध झाले आहेत, असे त्या अभिमानाने नमूद करतात.
“माझे भाऊ सांगली येथे जिल्हाधिकारी आहेत. वडिलांचे स्वप्न होते की आम्ही भावंडांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, आणि ते आज प्रत्यक्षात उतरते आहे,” असे त्या सांगतात.
सर्वांगीण विकासासाठी आर्थिक साक्षरता हा महत्त्वाचा पैलू असून शैक्षणिक व बौद्धिक विकासाबरोबरच जनसामान्यांनी आर्थिक गुंतवणुकीचे ज्ञान वाढविणे आवश्यक आहे, असा मोलाचा संदेश त्या लेखातून देतात.
नैतिक व मौलिक मूल्यांचे अधिष्ठान जपत ती मूल्ये समाजात रुजवणाऱ्या शोभा मोरे यांची ही वाटचाल यशाच्या अजून उंच शिखरापर्यंत पोहोचो, यासाठी आमच्या शुभेच्छा.





