दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात दाखल होणार

नवी दिल्ली, दि.१६। सहा महिन्यांपूर्वी नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते शनिवार १८ फेब्रुवारी रोजी भारतात आणले जाणार आहेत. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेतून चित्त्यांची दुसरी तुकडी भारतात दाखल होणार आहे. दक्षिण आफ्रिकी चित्त्यांची दुसरी तुकडी ग्वाल्हेर येथे हवाईमार्गे आणण्यात येईल. त्यानंतर त्यांना कुनो येथे आणले जाईल. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या चित्त्यांच्या दुसऱ्या तुकडीमध्ये ७ नर आणि ५ मादी चित्त्यांचा समावेश असणार आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. आज(गुरुवार) भारती हवाई दलाच्या उ१७ विमानाने ज्यास ग्लोब मास्टर म्हणूनही ओळखले जाते, सकाळी ६ वाजता हिंडन विमानतळावरून उड्डाण केले. हे विमान आज सायंकाळीच जोहान्सबर्गच्या ज.ठ टॅम्बो विमानतळावर उतरेल आणि उद्या (शुक्रवार) संध्याकाळी १२ चित्त्यांसह उड्डाण करणे अपेक्षित आहे. निवडलेले चित्ते क्वाझुलु नताल येथील फिंडा गेम रिझर्व्ह (२ नर, १ मादी) आणि लिम्पोपो प्रांतातील रुईबर्ग गेम रिझर्व्ह(५ नर, ४ मादी) येथू येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२२ रोजी आपल्या ७२ व्या वाढदिवशी नामिबियातून आणलेल्या पाच मादी आणि तीन नर अशा आठ चित्त्यांची पहिली तुकडी कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडली होती. हे चित्ते अभयारण्याच्या विस्तीर्ण परंतु बंदिस्त भागात शिकार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *