भारतीय जनता पक्ष निश्चितपणे भारतात क्रमांक एकचा पक्ष आहे. भाजपचा क्रमांक पहिला असला तरी तो निर्विवाद बहुमत देणारा नाही हे आता भाजपचे नेतेही मान्य करू लागले आहेत. उघडपणे कोणी बोलत नाहीत पण सर्वांच्याच मनात विरोधकांच्या ऐक्यामुळे धाकधूक निर्माण झाली आहे, हे मान्य केले पाहिजे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर करून आपण निवडणुका जिंकू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकर्षक घोषणा, त्यांचे मोहक भाषण आणि त्यांच्याकडून जनतेला असलेली आशा यामुळे भाजपला २०२४ ची केंद्रीय सत्ता मिळाल्यावर ८ वर्षापर्यंत फारशी काळजी नव्हती.
काँग्रेस पक्ष २० टक्के मते मिळवून असला तरी गलितगात्र होता. काँग्रेसला केवळ भाजपचाच विरोध नव्हता तर राज्या – राज्यातील राज्यपातळीवरील पक्ष काँग्रेसला फारसा भाव देत नव्हते. अशा परिस्थितीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी राहुल गांधी यांनी चक्क रस्त्यावर यायचे ठरविले. नेहमीप्रमाणे या पदयात्रेला भारतीय जनता पक्षाने सुरुवातीला फारसा भाव दिला नव्हता. पण जसजशी ही पदयात्रा गावागावातून जाऊ लागली तसतशी काँग्रेसची हवा वाढू लागली. राहुल गांधी यांचा राजकीय पुनर्जन्म झाला. लोकप्रियता मिळाल्यावर अहंकार येतो असे आपण नेहमीच पाहतो. पण राहुल गांधी यानंतर नम्र झाले. हेमंत बिस्वासारखा नेता भेटायला आल्यावर राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाशी जवळीक केली आणि आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. आता राहुल गांधी इतके बदलले आहेत की आता ते विरोधी पक्षाच्या ऐक्यातील मुकुटमणी झाले आहेत. आपल्याला पंतप्रधानपद नको, इतर कोणतेही पद नको, हे स्पष्टपणे सांगितल्यामुळे त्यांचे भाव आणखी वधारले आहेत. विरोधकांनी इंडियाची स्थापना केली. ३ बैठका घेतल्या आणि एकूण रागरंग पाहिल्यावर हे प्रकरण वाट्टेल तितके सोपे नाही याची पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची खात्री पटली.
पूर्वी स्वबळावर भारत पादाक्रांत करून राज्या – राज्यातील स्थानिक पक्षांना जराही भाव देणार नाही असा भाव होता तो बदलला आणि एनडीएची स्थापना करण्यात आली. याशिवाय जे जे इंडियात नाहीत त्यांनी एनडीएशी सलोखा करावा असेही धोरण ठरविण्यात आले. यामुळे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर दोस्ती करून त्यांना आपल्या बाजूने वळविले. ओरिसाचे मुख्यमंत्री पटनायक हे तर नेहमीच त्यांच्या बाजूने राहिले होते. त्यांची दोस्ती पक्की केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डी यांना कोणत्याही प्रकारे का असेना आपल्या बाजूने वळविले. बिहारमध्ये नितीश पटत नाही म्हणून मांझीपासून दोन्ही पक्षांबरोबर दोस्ती केली. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पाडून त्यांना आपल्या बाजूने वळविले. इतरही अनेक ठिकाणी लहानसहान पक्षांना आता भाजपचे नेते भाव देऊ लागले आहेत. आता यानंतर राहुल गांधी याची दुसरी पदयात्रा सुरू होत आहे. पहिल्या पदयात्रेने घोर केला, दुसरी पदयात्रा घनघोर ठरू नये म्हणून जे जे कच्चे दुवे असतील त्या सर्वांना आपल्याकडे वळविण्यासाठी सर्व प्रकारे उपाय करून २०२४ सालचा विजय पक्का करण्याचा भाजपचा इरादा दिसतो. आजच्या घडीला ३-४ राज्ये सोडली तर इंडियासमोर लोकसभेच्या निवडणुकीसाठी फारशी अडचण दिसत नाही. या इंडियातून पुन्हा कुणाला बाहेर काढण्यासाठी आता भाजपजवळही वेळ नाही.
१० तारखेपर्यंत सर्व जगातील नेते दिल्लीत येणार आहेत. तोपर्यंत ईडीसुद्धा चिडीचूप राहील अशी व्यवस्था करावी लागली आहे. मात्र ईडीचे सध्याचे अधिपती यांनी ४ दिवसांत कितीही पराक्रम केला तरी फारसे काही करू शकणार नाहीत. ३ राज्यांतील मुख्यमंत्र्यांना अटक केली जाईल असे म्हटले जाते. पण अशी अटक झाली तर त्याचा फारसा फायदा भाजपला होणार नाही असेही निरीक्षण आहे. यामुळे आता जे जे पक्ष इंडियात नाहीत त्यांच्याशी दोस्ती करून भाजपमधील जे जे राज्यातील प्रभाव असलेले नेते नाराज आहेत त्यांना थोडासा भाव देऊन त्यांचा उपयोग करून घेणे आणि नेहमीप्रमाणे जनतेला भावतील अशा घोषणा करणे हे आता भाजपला करावे लागणार आहे. भविष्यकाळात म्हणजे पुढच्या ८-१० महिन्यात भाजप आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावणार आहे यात शंका नाही. भाजपजवळ कार्यकर्त्यांची कमी नाही. आर्थिकदृष्ट्या भाजप सक्षम आहे. या सर्व बाबींचा विचार केला तर सदैव निवडणूक जिंकण्याचा विचार करणाऱ्या भाजपला आता आपले सर्वस्व पणाला लावून विजयाचा मार्ग शोधावा लागत आहे, असे एकूण चित्र आहे. आम्ही वारंवार म्हटल्याप्रमाणे मोदी, शहा आजही भारी आहेत, हे आम्हाला नम्रपणे नमूद करावेसे वाटते.