मुंबई

म्हाडाच्या ८४ अनिवासी गाळे ई-लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ

२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार
मुंबई : प्रतिनिधी-मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील ८४ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला दि.२ फेब्रुवारी, २०२६ रात्री ११.५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती म्हाडामार्फत देण्यात आली.

४ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. ५ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सदर ई-लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथे ०४ अनिवासी गाळे, कुर्ला- स्वदेशी मिल येथे ०५, कोपरी पवई येथे १५, मॉडेल टाऊन मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे ०१, सिद्धार्थ नगर गोरेगाव येथे ०१, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे १७ अनिवासी गाळे, मालवणी मालाड येथे २९ अनिवासी गाळे, चारकोप येथे १२ अनिवासी गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या अनिवासी गाळ्यांची आधारभूत विक्री किंमत म्हाडाच्या सुधारित ठरवानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. सदर ठरवानुसार अनिवासी गाळ्यांची विक्री किंमत व्यावसायिक शीघ्रसिद्ध गणक दराच्या बरोबरीने (१०० %) नुसार निश्चित करण्यात आलेली आहे. विक्री किंमतीत घट झाल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.

ई लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करतेवेळी अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील सन २०१८ नंतर काढलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून ऑफसेट किंमतीनुसार विहित अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे. सदर लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विवरण, सामाजिक आरक्षण व अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना, माहितीपुस्तिका याबाबतची माहिती https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery>Eauction>eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *