महाराष्ट्र राजकारण

कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय उलथापालथ

कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय उलथापालथ झाली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मनसेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मनसे आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांना आता पुष्टी मिळाली आहे.

कल्याण डोंबिवली मध्ये 62 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सत्तासंघर्ष उफाळून आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेने भाजप आणि ठाकरे गटाला धक्का देत सत्ता स्थापनेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आज बुधवारी मनसेचे पाच आणि एकनाथ शिंदे यांचे 53 नगरसेवक एकाच वेळी गट नोंदणीसाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते. मनसेचे पाच आणि एकनाथ शिंदे यांचे 53 नगरसेवक यांनी गट स्थापन केला.

मंगळवारी रात्री उशिरा शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांची बैठक झाली होती. या बैठकीत कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेचे आणि महापौर पदाची सूत्रे ठरली आहेत. यानंतर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि राजू पाटील यांचा एकत्रित फोटो समोर आला असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेने एकनाथ शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याचे सांगितले.

शिंदे गट म्हणजे मराठी माणसातील एमआयएम
कल्याण डोंबिवली मधील राजकीय स्थित्यंतराबद्दल खासदार संजय राऊत म्हणाले की , एकनाथ शिंदे गट म्हणजे मराठी माणसातील एमआय एम, बेईमान व महाराष्ट्रदोही आहे त्यामुळे त्याच्या सोबत जाणारे हे त्याच विशेषणास पात्र ठरतात. कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे सेना गटाला पाठिंबा दिल्यावरून राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पक्षांतर करणारे राजकीय रुग्ण, राज ठाकरे
काही मिळाले नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेचे काही लोक असतात. राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न आहे. अशा तऱ्हेचे पक्षांतर करणारे राजकीय रुग्ण आहेत अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *