मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद वाढली; मराठा मोर्चाचा जाहीर पाठिंबा, महापालिका रणधुमाळीत निर्णायक वळण
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असतानाच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेनंतर सत्तासमीकरणांना नवी दिशा मिळाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक सभेमुळे मुंबईत मोठी राजकीय हालचाल सुरू झाली असून, या सभेने कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य संचारले आहे. सभेनंतर भाजपकडून ठाकरे बंधूंवर जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली असतानाच, आता मराठा मोर्चाने थेट ठाकरे बंधूंना जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय चर्चांना नवा आयाम प्राप्त झाला आहे.
मराठा मोर्चाचा ठाकरे बंधूंना थेट पाठिंबा
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईतील मराठा समाज ठाकरे बंधूंना मतदान करण्याचे आवाहन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमुळे या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या पोस्टरनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
पोस्टरमधून ठळक संदेश
मराठा मोर्चाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये, “मुंबई ही ठाकरे यांच्याच हातात शोभून दिसणार” असा ठळक आणि थेट राजकीय संदेश देण्यात आला आहे. या पोस्टरद्वारे मराठा समाजाचा उघड आणि आक्रमक पाठिंबा ठाकरे बंधूंना असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
मुंबईच्या राजकारणात ‘गेमचेंजर’ ठरणार का?
मनोज जरांगे पाटील यांच्या या आवाहनानंतर, मराठा मोर्चाने मुंबईत ठाकरे बंधूंच्या बाजूने कौल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका निर्णायक ठरणार का? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आधीच तापलेलं वातावरण, आणि त्यातच मराठा मोर्चाचा जाहीर पाठिंबा — यामुळे मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
याचा थेट परिणाम मतदानावर होणार का, आणि हा पाठिंबा सत्तासमीकरणं बदलणार का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.




