सिंधुदुर्गात महायुतीचा ‘क्लीन स्वीप’ ठरणार? राणे-शिंदे जोडीच्या हुंकाराने कोकणच्या राजकारणात विरोधकांचे धाबे दणाणले?
विशेष प्रतिनिधी | कुडाळ:”सिंधुदुर्ग हा असा जिल्हा आहे, जिथे महायुतीचा विजय केवळ निश्चित नाही तर तो शंभर टक्के असणार आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळ येथील विराट सभेतून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकालच जाहीर करून टाकला. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांची वज्रमूठ आता कोकणात इतकी घट्ट झाली आहे की, इथे विरोधकांची डाळ शिजणे आता अशक्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
सभेला संबोधित करताना शिंदे यांनी कोकणी माणसाच्या इमानदारीचे आणि कष्टाचे कौतुक केले. मुंबई आणि ठाणे या शहरांवर आज जो महायुतीचा भगवा डौलाने फडकतो आहे, त्याचे खरे शिल्पकार हे कोकणी मतदारच आहेत, असे त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले. कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत; कार्यकर्त्यांच्या कष्टावरच राज्याची सत्ता उभी राहते आणि ही निवडणूक तुमच्या संघर्षाला न्याय देणारी आहे.
सिंधुदुर्गाच्या विकासाचा धागा नारायण राणे यांच्याशी जोडत शिंदे यांनी त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. “राणे साहेबांचा दरारा आणि त्यांचा अभ्यासू दृष्टिकोन यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आज महाराष्ट्रासाठी एक वस्तुपाठ ठरली आहे. नितेश आणि निलेश राणे हे दोन्ही तरुण नेतृत्व आता एकत्र मैदानात उतरल्याने जिल्ह्याच्या विकासाला महामार्ग मिळाला आहे,” असे ते म्हणाले. कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी १०० कोटींच्या बजेटचे स्वप्न त्यांनी यावेळी स्थानिकांना दाखवले.
केवळ घोषणाच नाही तर कामाचा लेखाजोखा मांडताना शिंदे यांनी लाडकी बहीण योजना, मुलींना उच्च शिक्षणात मिळणारी शंभर टक्के सवलत आणि आरोग्य विमा योजनांचा पाढा वाचला. केंद्रातील मोदी सरकारनेही यंदाच्या अर्थसंकल्पात कोकणातील पर्यटन, आंबा, काजू आणि नारळ उत्पादकांसाठी तिजोरी खुली केली असून, आता सिंधुदुर्गाला विकासासाठी काहीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सभेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी मतदारांना ‘सावध’ राहण्याचा इशारा दिला. “धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ या अधिकृत चिन्हांशिवाय अन्य कोणाकडेही पाहू नका. बंडखोर किंवा अपक्षांना दिलेले मत तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते,” असे आवाहन करत त्यांनी महायुतीच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. या ऐतिहासिक सभेला नितेश राणे, निलेश राणे, उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यासह महायुतीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते, ज्यांनी एक दिलाने कोकणावर विजयाची मोहर उमटवण्याची शपथ घेतली.




