निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा! सी-टीईटी परीक्षेसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांना काय दिले आदेश?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (C-TET) देणाऱ्या शिक्षकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या शिक्षकांची ही परीक्षा आहे, त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात आयोगाने राज्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले असून शिक्षकांना परीक्षेची तयारी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
मतदानाच्या तारखेतही बदल
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. यामुळे १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.
पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश
निवडणुकीच्या बदललेल्या तारखेमुळे अनेक शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा आणि निवडणूक कर्तव्य एकाच दिवशी येत होते. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षक संघटनांनी आयोगाकडे धाव घेतली होती. त्याची दखल घेत, परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकांच्या जागी पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि संबंधित शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, ही सूट केवळ परीक्षा असलेल्या शिक्षकांसाठीच लागू असणार आहे.





