शिवरायांच्या आरमारी सामर्थ्याचा आता शास्त्रीय अभ्यास; मालवणात मुंबई विद्यापीठाचे ‘अध्यासन केंद्र’ सज्ज
मुंबई, विशेष प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर उभारलेल्या ऐतिहासिक जलदुर्गांचा वारसा आणि त्यांचे सामर्थ्य जगासमोर आणण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार महत्त्वाच्या किल्ल्यांच्या सखोल संशोधनासाठी मालवणमध्ये मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापन करण्यास सांस्कृतिक कार्य विभागाने ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली.
संशोधनाला मिळणार हक्काचे व्यासपीठ
हे अध्यासन केंद्र मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयात डॉ. ज्योती तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित होईल. या केंद्राच्या माध्यमातून ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, नवीन संशोधन प्रबंध, तज्ज्ञांची व्याख्याने आणि युवा संशोधकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातील. शिवकालीन सागरी व्यापाराचे गुपित आणि किल्ल्यांच्या वास्तूकलेचे शास्त्रशुद्ध दस्तावेजीकरण करणे, हा या केंद्राचा मुख्य हेतू आहे.
युवा पिढीसाठी ऐतिहासिक संधी
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८ व्या वर्षपूर्तीवेळी आम्ही या केंद्राचे वचन दिले होते, जे आज पूर्ण झाले आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागू नयेत, ही सरकारची भावना आहे. या केंद्रामुळे जास्तीत जास्त युवकांना शिवरायांच्या दूरदृष्टीचा अभ्यास करून त्यातून देश उभारणीची प्रेरणा घेता येईल.”
या केंद्रासाठी पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि स्थानिक इतिहासतज्ज्ञांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. या निर्णयामुळे कोकणातील ऐतिहासिक पर्यटनाला संशोधनाची जोड मिळणार असून, शिवकालीन इतिहासाचे अनेक पैलू उजेडात येण्यास मदत होणार आहे.
—
Deepak Kaitke




