मुंबई दि. ८ प्रतिनिधी:सुप्रिया प्रॉडक्शन्स आयोजित बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत दहा बोलीभाषेतील अठरा एकांकिकांमधून ‘पाकिस्तानचं यान’ या घाटी बोली भाषेतील एकांकिकेने सर्वोत्कृष्ट स्थान पटकावत बाजी मारली. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी जबरदस्त रंगली. या स्पर्धेत राज्यभरातून १० बोलीभाषांतील १८ एकांकिका सहभागी झाल्या होत्या. त्यातून अंतिम फेरीत एकूण सात एकांकिका सादर झाल्या. त्यामध्ये नाट्यांकुर, मुंबई या संस्थेची ‘पाकिस्तानचं यान’ ही घाटी बोलीभाषेतील एकांकिकेने सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला . नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कार देऊन या एकांकिकेला गौरविण्यात आले.
यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष होते. नाट्यारंभ, एन.के.टी.टी., ठाणे या संस्थेची मालवणी बोलीभाषेतील ‘सत्य’ ही एकांकिका द्वितीय आणि नक्षत्र कलामंच, मुंबई या संस्थेची खान्देशी बोलीभाषेतील ‘पाकळ्या’ ही एकांकिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. प्रेक्षक पसंती एकांकिका म्हणून ‘डिझाईन’ या एकांकिकेला पारितोषिक मिळाले. सुप्रिया गोविंद चव्हाण यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. नामवंत रंगकर्मी डॉ. मिलिंद शिंदे, मंगेश सातपुते व संदीप रेडकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या पुरस्कार वितरणावेळी विजेत्यांसह सर्व स्पर्धकांनी जबरदस्त जल्लोष केला.
gajanantupe2@gmail.com




