कसारा :– त्यागमूर्ती माता रमाई च्या जयंती प्रित्यर्थ शनिवारी कसारा येथे ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी जिल्हा परिषद शाळा डॉ आंबेडकर नगर येथील बाबासाहेबांच्या स्मारक परिसरात स्थानिक शिक्षकवृंद आणि मान्यवरांच्या हस्ते रमाईच्या प्रतिमेचे यथायोग्य पूजन करण्यात आले; तर अग्रवाल हायस्कूल मध्ये रिपाईं पदाधिकारी आणि कसारा विभाग एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने करुणासागर रमाईला वंदन करण्यात आले.
शिवाय येथील भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने समता नगर समाज हॉल मध्ये रमा मातेच्या जीवनावर आधारित श्रवणीय प्रवचन पार पडले.पंचशील नगर मध्ये रिपाईं नेते प्रदीप पवार आणि सहका-यांनी देखील रमाई प्रति कृतज्ञता व्यक्त करीत सामुदायिक वंदन केले.भाजपा शाखा कार्यालयात सुद्धा विनायक सावंत,कुंदन जाधव या प्रमुख पदाधिका-यांच्या माध्यमातून रमा मातेच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले.सायंकाळी येथील रिपाई शहर तथा युवक शाखा,धम्मचक्र प्रवर्तन संघ आणि महिलांच्या सम्यक संबुद्ध सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्षा कोमल शेजवळ,सौ शिंदे आणि सहकारी महिलांनी माता रमाईच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली होती.या मिरवणूकीत प्रत्येक नगरातील रमाईच्या लेकिंची लक्षणीय गर्दी दिसत होती.मिरवणूक दरम्यान पो नि सुरेश गावित यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.




