मुरबाड पोलिसांनी घरफोडी सह सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या; आरोपींकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मुरबाड, दि.८,प्रतिनिधी:मुरबाड शहरातील माऊली नगर विभागात व आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्या समोरील बिल्डिंग मध्ये दि.२४ जाने रोजी भरदिवसा घरफोडी करून चोरांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम ३६२५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याची तक्रार मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याचा मुरबाड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक डी. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना देऊन मार्गदर्शन केले.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दादासो एडके, यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. संदीपान सोनवणे, उपनि.श्याम आरमळकर, पो.हवा.रामदास शिंदे, नितीन घाग, राहुल गावडे, धनराज देवरे, पो. अंमलदार अर्जुन पारधी यांचे विशेष पथक तयार करून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन तपासाला सुरुवात करण्यात आली. तेव्हा कौशल्य पूर्वक तपास करत पोलिसांनी यातील आरोपी, शेरा सुरेश चव्हाण, सद्दाम हुसेन जमलुद्दीन खान, याला ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता, त्यांनी अनेक गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे असणारा गुन्हेगार भैया ऊर्फ पवन आर्या, संजय रत्नेश कांबळे, ऊर्फ सलीम कुबडा,अब्दुल जमीर पठाण ऊर्फ टकल्या,मनोज तेजराज जैन, यास ताब्यात घेताच त्यांनी गुन्हा कबूल करून, सदर गुन्ह्यातील मुद्देमाल विक्री केल्याचे सांगितले असून, मुरबाड पोलिसांनी आपले कसब लावून ताब्यात घेतलेल्या आरोपींविरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून,ते अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना पाहिजे होते, यातील सराईत गुन्हेगार शेरा सुरेश चव्हाण याच्यावर ठाणे जिल्ह्यातील कोपरखैरणे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल आहे.
तर सद्दाम हुसैन जमालुद्दीन खान याच्यावर ठाणे शहर पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.तसेच संजय रत्नेश कांबळे ऊर्फ सलीम कुबडा याच्यावर मुंबई,ठाणे, कळवा व मुरबाड पोलीस ठाण्यात एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.तर अब्दुल जमीर पठाण ऊर्फ टकल्या याच्यावर बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल असून मनोज तेजराज जैन याच्यावर वाकोला पोलीस स्टेशन व एल टी मार्ट मुंबई अशा दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल करणाऱ्या मुरबाड पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.




