मुरबाड

टोकावडे ग्रामीण रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची धावती भेट

मुरबाड, दि. ६, प्रतिनिधी:ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दि. ४ फेब्रुवारी रोजी, बुधवारी सायंकाळी ८ वाजता टोकावडे ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. या वेळी मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील सर्व विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयात अतिरिक्त बेडची संख्या वाढविण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. यावेळी त्यांनी उपचार घेत असलेल्या काही रुग्णांची विचारपूसही केली.
अचानक ठरलेल्या या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उशिरापर्यंत सुरू असलेले शस्त्रक्रिया गृह पाहिले. अतिदुर्गम भागात रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा व सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीच्या वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मोकाशी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पियुष शहा, डॉ.अमोल शेटे,डॉ. सागर योगी, डॉ.अजय जामकर तसेच सर्व शस्त्रक्रिया विभागामधील वैद्यकीय अधिकारी,रुग्णालयातील विविध
विभागप्रमुख व कर्तव्यावर असलेले कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील इतर रुग्णालयांनाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ अशाच प्रकारे अचानक भेटी देणार असल्याची चर्चा आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *