मुरबाड,दि.२,प्रतिनिधी:महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील म्हसा यात्रेत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी उत्पादने, शेतीसाठी आवश्यक अवजारे तसेच जिल्हा अग्रणी बँकेमार्फत विविध सबसिडी योजनांची माहिती दिली जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील म्हसा,बोरिवली रोड येथे दि. ०४ जानेवारी २०२६ रोजी ‘कृषी महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संवाद व विक्री व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.या कृषी महोत्सवामध्ये एकूण २२ स्टॉल उभारण्यात येणार असून कृषी प्रदर्शने हा महत्त्वाचा घटक असणार आहे.
यामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले श्री अन्न (मिलेट्स), फळे, फुले, भाजीपाला, कडधान्ये तसेच अन्न प्रक्रिया केलेले विविध पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच शेतीसाठी आवश्यक असणारी विविध आधुनिक कृषी अवजारे या ठिकाणी प्रदर्शित व उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.कृषी विषयक माहिती, मार्गदर्शन व अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासाठी कृषी व कृषी संलग्न विभागांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. तसेच जिल्हा अग्रणी बँकेमार्फत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्ज व सबसिडी योजनांची माहिती देण्यात येणार असून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित व प्रक्रिया केलेल्या दर्जेदार शेतमालासाठी उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीसाठी स्वतंत्र दालने उभारण्यात आली आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास योग्य दर मिळण्यास मदत होणार असून ग्राहकांना ताज्या व दर्जेदार मालाची थेट खरेदी करता येणार आहे.शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साखळीचा विकास, कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या कृषी महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.तरी ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी तसेच म्हसा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांनी व यात्रेकरूंनी या कृषी महोत्सव कार्यक्रमास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.




