मुरबाड, दि.१५,प्रतिनिधी,मुरबाड तालुक्यात गावात महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेला मुरबाड येथील शासकीय रुग्णालयात आणली असता अपुऱ्या सुविधांमुळे महिलेला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मुरबाड तालुक्यातील चिखले गावात भारती नारायण भोईर (वय – ४५) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.त्या गुरुवारी सायंकाळी ०६:३० च्या सुमारास स्वयंपाकासाठी घराच्या मागील बाजूस सरपण आणण्यासाठी गेल्या असता फाट्यांमध्ये लपलेल्या विषारी सापाने त्यांना दंश केला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मुरबाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र येथे सर्पदंशावर उपचारासाठी आवश्यक कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी सांगण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
दरम्यान अशीच एक घटना शुक्रवारी सायंकाळी पिंपळगाव येथे विवेक वाघ वय – ६ या चिमुकल्यालाही सर्पदंशाची घटना घडली होती. सायंकाळी ०७:०० वाजेच्या सुमारास घडली होती. त्याला मुरबाड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यालाही पुढील उपचारासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी सांगण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्राथमिक माहितीनुसार हा दंश बिनविषारी सापाचा असावा, असा अंदाज सर्परक्षक प्रवीण भालेराव यांनी व्यक्त केला.
दरम्यान,या सलग दोन घटनांमुळे मुरबाड शासकीय रुग्णालयाची विदारक अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. नावाला रुग्णालय, मात्र आपत्कालीन सेवांचा अभाव अशीच स्थिती मुरबाड तालुक्यात आहे. सर्पदंश, गंभीर अपघात किंवा इतर तातडीच्या आजारांमध्ये रुग्णांना कल्याण, ठाणे किंवा मुंबई येथे धाव घ्यावी लागते. लांबचे अंतर, वाहतुकीचा ताण आणि वेळेअभावी यापूर्वीही अनेक रुग्णांचे जीव गेले आहेत.
दरम्यान, मुरबाड शासकीय रुग्णालयातील सुविधा नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून सर्पदंशाची औषधे,अँटी-स्नेक व्हेनमचा पुरेसा साठा, प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ आणि २४ तास अत्यावश्यक सेवा तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




