मुरबाड

फांगुळगव्हाण ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्यात विषारी औषध ओतल्याने नदीपात्रात मृत मासे तरंगले

मुरबाड, दि.१७,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट शेजारील नदीत पिण्याच्या पाण्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विषारी औषध ओतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे नदीपात्रातील मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगत असून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साखरवाडी या गावातील नदीमध्ये अज्ञात व्यक्तींनी विषारी औषध ओतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दि.१३ फेब्रु.मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी असे पंप सुरु करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाने सांगितले आहे. सकाळी ६:०० वाजता नेहमीप्रमाणे पंप सुरू करण्यासाठी आले असता,नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसून आले.याची माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी पाहणी करून पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले. गावातील गुरं,जनावरे हे पाणी पिल्यानंतर विषबाधा होण्याची संभावना आहे. नदीत या प्रकारामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसून आले असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून जलप्रदूषणामुळे जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागांनी पाहणी सुरू केली असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सरपंच सविता रवींद्र भला यांनी केली आहे.
“नदीच्या पाण्याचे नमुने शहापूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल येईपर्यंत ग्रामस्थांना टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाईल.” बाळू कोकणे-ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत फांगुळगव्हाण

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *