महिलांच्या डब्यात बुरखा घालून ‘त्याचा’ घाणेरडा खेळ; रेल्वे पोलिसांच्या नाकाखालून नराधम पसार कसा होतो?
विशेष प्रतिनिधी:मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा पुरता बोजवारा उडाला असून, मध्य रेल्वेवर घडलेल्या एका संतापजनक प्रकाराने महिला प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एका विकृत पुरुषाने चक्क बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात घुसखोरी केली आणि बुरख्याच्या आड लपून महिलांना लज्जास्पद स्पर्श करत विनयभंग केला.
घाटकोपर स्थानक येण्यापूर्वीच या संशयिताच्या हालचाली लक्षात येताच धाडसी महिला प्रवाशांनी त्याला जाब विचारत घेरले. मात्र, आपण उघडे पडल्याचे समजताच या नराधमाने पोलिसांना आव्हान देत चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्जत फास्ट लोकलमध्ये चढून पळ काढला. रेल्वे पोलिसांची गस्त आणि सुरक्षेचे दावे किती पोकळ आहेत, हेच या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या विकृत व्यक्तीने केवळ गर्दीचा फायदा घेतला नाही तर अत्यंत नियोजनबद्धरीतीने आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. घाटकोपर आरपीएफने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी, पोलिसांच्या हातात अद्याप केवळ सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओच आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या महिन्यात अंबिवली स्थानकावरही अशाच प्रकारे बुरखा घालून एकाने चैन स्नॅचिंग केली होती.
या दोन्ही घटनांचा सूत्रधार एकच असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर गुन्हेगार अशा प्रकारे वेशांतर करून महिलांच्या डब्यात धुमाकूळ घालत असतील, तर महिलांनी प्रवास करायचा कसा, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सध्या कुर्ला आणि कल्याण जीआरपीचे पथक या नराधमाचा माग काढत असून, तांत्रिक तपासाच्या आधारे शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भरदिवसा आणि गर्दीच्या वेळी अशा प्रकारे गुन्हा करून आरोपी पोलिसांच्या डोळ्यादेखत पसार होतोच कसा, हा मोठा प्रश्न आहे. रेल्वे प्रशासनाने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात महिलांच्या डब्यात सुरक्षा रक्षक तैनात करणे गरजेचे आहे. पोलिसांनी या नराधमाला तातडीने बेड्या ठोकाव्यात, अन्यथा महिला प्रवाशांचा संताप अनावर होईल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
—
Deepak Kaitke




