विशेष प्रतिनिधी | मुंबई:आजपासून राज्यातील महापालिका निवडणुकांना खऱ्या अर्थाने वेग आला. कारण उमेदवारी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस. मात्र, अपेक्षित शिस्तीऐवजी बंडखोरीचं वादळ उठल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. विरोधकांच्याच नव्हे तर सर्व प्रमुख पक्षांना नाराजांना रोखण्यात अपयश आलं आहे. तिकीट न मिळाल्याची खंत, स्थानिक समीकरणांचा तिढा आणि अंतर्गत नाराजी—यातूनच मुंबईत अनेक ठिकाणी बंडाचं निशाण फडकवले गेले आहे.
भाजपमधील बंडखोरी कायम—कोणत्या प्रभागांत रणधुमाळी
शेवटच्या क्षणी बंडखोर माघार घेतील, अशी आशा व्यक्त होत होती. पण ती फोल ठरली. मुंबईत भाजपच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी बंडखोरी कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
वॉर्ड 60: दिव्या ढोले बंडावर ठाम; भाजपची अधिकृत उमेदवार—सायली कुलकर्णी
वॉर्ड 173: शिल्पा केळुसकर यांची बंडखोरी कायम; येथे ची पूजा कांबळे अधिकृत
वॉर्ड 205: जान्हवी राणे मैदानातच; भाजपची अधिकृत उमेदवार—वर्षा शिंदे
वॉर्ड 177: माजी नगरसेविका नेहल शाह ठाम; भाजपकडून कल्पेशा जेसल कोठारी
वॉर्ड 180: जान्हवी पाठक बंडावर कायम; येथे शिंदे गटाकडून तृष्णा विश्वासराव
या बंडखोरीमुळे त्रिकोणी/बहुकोणी लढती वाढण्याची शक्यता असून, गणिते शेवटच्या टप्प्यात अधिकच गुंतागुंतीची होत आहेत.
महापालिकेच्या रणसंग्रामाचे रणांगण तप्त झाले आहे
आज अनेक उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी बंडखोरांच्या ठाम भूमिकेमुळे काही प्रभागांत निकालाची गणिते पूर्णपणे बदलली आहेत. काही ठिकाणी भाजप व शिंदे गटाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले, पण त्याचवेळी नाराजीची आग इतर वॉर्डांत भडकलेलीच आहे.
महायुतीची आखणी, तरीही तडे
मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर
शिंदे गट 90 जागांवर
भाजप 137 जागांवर निवडणूक लढवत आहे
बंडखोरी टाळण्यासाठी अधिकृत यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचे वाटप करण्यात आलं. तरीही, स्थानिक पातळीवर उमेदवारी न मिळाल्याचा असंतोष आवरता आला नाही, हे आज स्पष्ट झालेले आहे.
राजकीय समीकरणं अधिक गुंतागुंतीची
एका बाजूला ठाकरे बंधूंची जवळीक, दुसरीकडे भाजप–शिंदे गटाची युती, तर तिसऱ्या आघाडीवर स्वबळावर—या पार्श्वभूमीवर बंडखोर उमेदवार ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र भविष्याच्या गर्भात काय दडलेले आहे. हे आज सांगता येत नाही.
बंडखोरीच्या धगीने मुंबईचं राजकारण तापलं आहे. शिस्तीचा दावा करणाऱ्या पक्षांनाही नाराजांना रोखता न आल्याचं वास्तव समोर आलं. आता प्रश्न एकच—
बंडखोर कोणाचा खेळ बिघडवणार, आणि कुणासाठी निकालाची दिशा बदलणार?
मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात उत्तर लवकरच मिळणार आहे. राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युती आणि आघाड्या उदयास आलेल्या आहेत त्यातच बंडखोरांचे माजलेले पीक कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ घालते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.





