पोलीस–मनपाचे अधिकारी ठाण मांडून; भाजपवर थेट गंभीर आरोपांनी राजकारण तापलं
मुंबई प्रतिनिधी:तब्बल नऊ वर्षांनंतर होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अटीतटीची ठरणार, हे आता उघडपणे दिसू लागले आहे. मात्र, या रणधुमाळीत पूर्व उपनगरातील वॉर्ड क्रमांक १३५ (मानखुर्द–शिवाजीनगर) केंद्रस्थानी आला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी कोणाचेही नाव न घेता थेट आणि भाजपा वर अत्यंत गंभीर आरोपांची तोफ डागली आणि राजकीय वातावरणात खळबळ माजली.
‘हाय प्रोफाईल’ वॉर्डमध्ये प्रशासन ठाण मांडून?
नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वॉर्ड १३५ मध्ये पोलिस व मनपा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी ठाण मांडून बसले आहेत आणि विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर दबाव टाकत आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये दुर्लक्षित राहिलेला हा वॉर्ड अचानक भाजपसाठी ‘हाय प्रोफाईल’ का ठरला, हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या एका वॉर्डात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम आणि मंत्री आशिष शेलार यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे—असा दावा केला जातो.
विश्वासू उमेदवार… आणि सत्तेचं कवच?
हा वॉर्ड उत्तर भारतीय व मुस्लिम बहुल, सुमारे ८० टक्के झोपडपट्ट्यांनी वेढलेला मानला जातो. मुंबईतील सर्वाधिक आव्हानात्मक वॉर्डांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १३५मधून, मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासू आणि प्रदेश भाजपच्या माध्यम विभागाचे प्रमुख नवनाथ बन यांना उमेदवारी दिल्याने राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
आरोपांनुसार, मुख्यमंत्र्यांनी स्वतः या वॉर्डात सर्व प्रमुख नेत्यांना ‘सर्वशक्ती पणाला लावा’ असे मौखिक निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, गृहखातेही मुख्यमंत्र्यांकडे असल्याने, पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विरोधी उमेदवारांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. परिणामी, विरोधी उमेदवार तणावाखाली प्रचार करत असल्याचेही सांगितले जाते.
मतदानाला १५ दिवस… आणि ‘करामती’ंची चर्चा
प्रत्यक्ष मतदानाला अवघे १२ दिवस उरले असताना, पुढे काय घडणार? हा सवाल उपस्थित झाला आहे. आरोपांच्या फैरी झाडताना नवाब मलिक यांनी दावा केला की, फडणवीस साम–दाम–दंड–भेद–नीती या पंचसूत्रीचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत, तर दुसरीकडे आपल्या पक्षाच्या विरोधातील अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी ‘पाण्यासारखा पैसा’ ओतत असून, एसआरए प्रकल्प, मनपातील टेंडर आदीत प्राधान्य देण्याची लालूच दाखवत असल्याचा आरोपही करण्यात आला.
ठाकरे बंधूंवर विरोधकांची नजर
अशा वातावरणात काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे नेते ठाकरे बंधूंंकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. कारण, गेली २५ वर्षे भाजपसोबतच्या युतीचा अनुभव असल्याने, निवडणुकीच्या ऐनवेळी भाजप काय करू शकतो याची इत्यंभूत माहिती या दोघांकडे आहे, असा सूर आहे.
सूत्रांचा दावा असा की, मनसेचे मनसैनिक अत्यंत आक्रमक असून, राज ठाकरे यांचा आदेश आला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही—मग समोर राजकीय नेता असो वा प्रशासकीय अधिकारी.
निवडणूक नव्हे, इतिहास घडणार?
एकूणच, वॉर्ड १३५मध्ये सुरू असलेली ही सत्तेची कोंडी, प्रशासनाची उपस्थिती, आरोप–प्रत्यारोप आणि ठाकरे बंधूंची संभाव्य भूमिका—या सर्व घटकांमुळे ही निवडणूक आजचे मतदार नव्हे, तर उद्याचे मतदारही आठवणीत ठेवतील, असा सूर राजकीय वर्तुळात आहे.
ही लढाई फक्त जागांची नाही; ती सत्तेच्या वापराची, विरोधाची आणि लोकशाहीच्या कसोटीची आहे
आणि म्हणूनच मुंबई मनपा निवडणूक इतिहासात लक्षात राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.




