गेल्या दहा-बारा वर्षांपासून भारतामध्ये स्वच्छ शहरांची निवड केली जाते. त्यासाठी कोणते निकष लावले जातात ते आम्हाला माहित नाही परंतु, या निवडीमध्ये आपल्या प्रगतिशील महाराष्ट्राचे एकही महानगर नाही मध्य प्रदेशातील ज्या शहरावर अहिल्याबाईंनी राज्य केले. त्या शहरावर मात्र बदनामीचा एक मोठा शिक्का बसलेला आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे. ऊपर से टाम टू अंदर की राम जाने, अगदी तशीच परिस्थिती गेल्या अनेक वर्ष स्वच्छतेत देशातील क्रमांक एकचे शहर असलेल्या इंदूरची झाली आहे.
इंदूर महानगरपालिकेच्या सामान्य नागरिकांच्या वस्तीमध्ये जलवाहिनी मधून झालेला पाणीपुरवठा प्रदूषित होता असे म्हणण्यापेक्षा विषारी होता, असे म्हणणे भाग आहे कारण त्या घटनेमध्ये १५ निष्पाप लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. मरण पावलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी टपलेल्या इंदूर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी एक अनधिकृत शौचालय बांधण्यात आले होते आणि त्यातील मळ किंवा मैला पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीत शिरला होता असे सांगितले. म्हणजेच १५ निरपराध नागरिक मरण पावल्यावर या अनधिकृत शौचालयाचा शोध लागलेला आहे. यावरून स्वच्छ इंदूरचा पोकळपणा आणि आत लपलेली अस्वच्छता यांनी किती मोठे अक्राळ विक्राळ रूप धारण केलेले आहे हे सहजच दिसून येते. इंदूर शहरात जे रस्ते आहेत त्यांची फारच मोठी गंमत आहे.
येथे चारचाकी वाहनांना मोकाट रस्ते आणि दुचाकी वाहनांची गैरसोय अशी स्थिती आहे. इंदूरला मेट्रोसिटी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे, तिथल्या धूळ प्रदूषणाबाबत न बोललेलेच बरे. पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणवून घेणा या पुण्यश्लोक देवी अहिल्या यांच्या इंदूरचे हे महाभयानक वास्तव किती जीवघेणे आहे याची कल्पनाच यावरून येते. आता अशी वार्ता आहे की जे बिचारे मेले ते सुटले, मात्र जे जिवंत आहेत ते मरण यातना भोगत आहेत. त्यांचा म्हणजेच मरणयातना भोगणाऱ्यांचा आकडाही शेकड्यांमधला आहे. येथील आमदार कैलाश विजयवर्गीय हे आहेत. हे विजयवर्गीय येथील प्रथम नागरिक होण्याच्या मार्गावर होते पण मोदीजींनी त्यांचा विजय होऊ दिला नाही, हे शहर आणि तेथील खाऊगल्ली म्हणजे सराफा केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही सुप्रसिद्ध आहे. मग त्या प्रसिद्ध खाऊ गल्लीत बाहेरून बनवून जे पदार्थ आले असतील किंवा येत आहेत, ते अशा घाणेरड्या पाण्यात तयार करण्यात आले होते की काय असेही विचारता येईल.
या संपूर्ण भयानक प्रकारा बाबतीत कोणीही स्पष्ट बोलत नाहीत, ज्या बिचाऱ्याने शौचालय बांधले तेव्हा त्याला कोणीच अडवले नव्हते, आता बळी गेल्यावर मात्र त्याच्यावर आरोप करण्यात येत आहे. म्हणजे एक दुसऱ्यावर आरोप करतो दुसरा तिसऱ्यावर आरोप करतो अशीही आरोपांची मालिका अखंडपणे सुरू आहे. या आरोपांच्या फैरी आणि एकूण घटनेचे गांभीर्य याबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेच दखल घेतल्यामुळे चौकशा आणि निलंबने वगैरे होत आहेत. परंतु जे निष्पाप नागरिक मरण पावले त्यांची जबाबदारी कोणावर, या प्रश्नाचे उत्तर फार कठीण आहे.
स्वच्छतेच्या नावावर गर्व करणाऱ्यांचे गर्वहरण करणारा आणि मृत्यू मार्गाला घेऊन जाणारा प्रदूषणाचा हा विषारी प्रहार इंदूर शहराची मोठीच बदनामी करीत आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यावर थेट स्वर्गातून पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या डोळ्यांमधून टपाटप आसवे गळत असतील. मुख्य बाब अशी आहे की सामान्य माणसांच्या जीवाला जराही किंमत नसते. फारफार तर चार-आठ दिवस बोंबाबोंब होईल निलंबने होतील आणि पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ सारखा प्रकार होईल आणि पुढच्या वर्षीही याच शहराला पहिला क्रमांक दिला जाईल




