खरी खरी टॉप स्टोरी संपादकीय

असेही दादा

(श्रीकृष्ण चांडक)महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर अजित दादा स्वर्गाच्या वाटेने गेले. त्यांची शिस्त, त्यांचा लोकसंग्रह, स्पष्टवक्तेपणा वगैरे वगैरे सर्वांनाच ठाऊक आहे, किंबहुना तो प्रसिद्ध आहे. पण दादा व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांनी कुणाकुणावर कशीकशी माया केली. याची जी काही माहिती आमच्या जवळ आहे त्यावरून दादांचे वेगळेपण इतरांपेक्षा ठळकपणे नक्कीच उठून दिसते.

दादांच्या जवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समय मर्यादा व पायाभूत महाराष्ट्राच्या विकासाची पायवाट, शंकराव चव्हाण यांची शिस्त, काका शरदचंद्र पवार यांचा लोकसंग्रह, महाराष्ट्राचे विद्वान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निरीक्षण व आकलन शक्ती, बॅरिस्टर अंतुले यांची धडाडी आणि इतर अनेक गुण त्यांना राज्यकर्ता म्हणून वेगळ्याच चरित्राचा नेता ठरवितात.

दादा कुटुंबात कसे वागत याची निरीक्षणे मन हेलावणारी आहेत. दादा कुठेही असले तरी काठेवाडी या आपल्या परंपरागत म्हणजेच मूळ गावात राहणाऱ्या आईला नित्यनेमाने भेटत असत. अजित आला नाही तर त्यांची पुत्रवेडी आई आजारी पडत असे आणि आपला दादा आला की अजित दादांच्या आईचा आजार कुठल्या कुठे पळून जाई. आज त्या आईचा पोरकेपणा कसा भरून निघणार ? आईला भेटायला जाताना काठेवाडी मधल्या शाळेतील मुलांसाठी खाऊ घेऊन जाणे हा त्यांचा परिपाठ होता. त्या बालकांचे आजोबा आणि गावकऱ्यांचे परममित्र अजितदादा आता त्यांना कुठे भेटणार ?

दादांच्या शेतातील गाई त्यांच्या प्रेमापाई आता कुठे आणि कशा धावून येतील. दादा त्या गाईंना यमुना आणि सरस्वती या नावाने हाका मारायचे आणि त्या गाई वात्सल्याने पळत पळत दादांच्याकडे यायच्या. आपल्याकडे काम करणाऱ्या निष्ठावंतांना दादांनी भरभरून प्रेम दिले. त्यांच्याकडे सध्या संपत जाधव नावाच्या सालदाराची दुसरी पिढी निष्ठेने काम करीत आहे. हनुमंतराव पाटील नावाचे त्यांचे निकटवर्ती सहकारी जणूकाही दादांचे अविभाज्य अंग बनलेले आहेत. आपल्या माणसांना जोडणे आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे हा दादांचा गुण होता.

आपला पुत्र पार्थ पवार याला उपदेश देताना दादांनी, ‘कुणावरही आंधळा विश्वास टाकू नकोस. काळजीपूर्वक माणसे निवड’ अशी शिकवण दिली होती. त्यांनी जसे आईवर प्रेम केले तसेच प्रेम पत्नी म्हणून सुनेत्रा ताईंवरही केले. बहिणीने बायकोचा पराभव केल्यावर त्यांनी जिद्दीने सुनेत्रा ताईंना बहिणीसारखेच खासदार पद मिळवून दिले. बहीण पाच वर्षांसाठी खासदार आहे तर बायको सहा वर्षांसाठी खासदार आहे‌. दादांनी आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला संरक्षण देणाऱ्या वॉचमनांवरही कौटुंबिक प्रेम केले. दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होत असताना त्यांचा वॉचमन असलेल्या माणसाच्या मुलाच्या लग्नात दादांनी हजेरी लावून आशीर्वाद दिले होते. बारामतीच्या घरी जो वॉचमन होता, त्याच्या मुलाच्या बारशाला हक्काने हजेरी लावून आपले त्याच्या विषयीचे प्रेम दादांनी व्यक्त केले होते.

पुण्यातील एका वॉचमेनचे वडील वारले त्यांच्या अंत्यसंस्काराला हजर राहून त्या वॉचमनला त्यांनी सांत्वना दिली. वास्तविक इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीने साध्या फोनद्वारे किंवा एखादी भेटवस्तू पाठवूनही काम साधले असते. मात्र या हळव्या मनाच्या माणसाने तेच कार्य किती प्रेमाने केले याचे हे उदाहरण खरोखर पाहण्यासारखे आहे. आपल्यासाठी काम करणाऱ्या माणसांच्या सोबत त्यांनी केलेल्या जपणुकीची अनेक उदाहरणे आहेत. ज्यांच्यावर दादांनी प्रेम केले. त्या सर्वांसाठी दादांनी शक्य तेवढ्या सर्व बाबी कायद्यात बसवून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अकाली निधनाने अनेक सामान्य आणि असामान्य जनांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर असाच वाहत नाही. तर कुठेतरी दादांच्या वेगळेपणाची आणि आपलेपणाची प्रचिती आल्यामुळे हे सर्व आपोआप घडते आहे.

दादा नक्कीच सत्ताप्रेमी होते यामध्ये दुमतच नाही. कारण, त्यामुळे अनेकांची कामे करता येतात असे ते मोकळेपणाने बोलून दाखवत असत. दादांच्या अशा वेगळेपणाचे अनेक किस्से काठेवाडी, बारामती, पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मंत्रालयात अनेकांना माहित आहेत. असे म्हणतात की, ‘राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तद्नंतरे’ हेच त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. दादांचे आजचे धक्कादायक निधन त्यांच्या परिवाराप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक परिवारांना वेदना देणारे वाटते ही वस्तुस्थिती आहे. कारण दादा म्हणजे वाहते पाणी होते. त्या शुद्ध पाण्याप्रमाणेच ते पाणीदारही होते आणि बाणेदारही होते. ते मेणाहून मऊ आणि सुतासारखे सरळही होते, अशा या कडक शिस्तीच्या आवरणाखाली लपलेल्या प्रेमळ माणसाला आमची श्रद्धांजली!

-श्रीकृष्ण चांडक

संस्थापक/ संपादक
दैनिक महासागर

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *