टॉप स्टोरी देश

राजकीय गुपित की सत्तेचा नवा ‘गेम’? फडणवीसांच्या लागोपाठच्या दिल्ली वाऱ्यांनी विरोधकांची झोप उडवली!

विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:एकाच आठवड्यात दोनदा दिल्लीवारी आणि थेट हायकमांडच्या महत्त्वाच्या नेत्यांशी खलबतं… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या धावपळीने राज्याच्या राजकारणात सध्या संशयाचे आणि कुतूहलाचे काहूर माजवले आहे. “दौरा सदिच्छा होता,” असे वरवर सांगितले जात असले तरी, ज्या वेगाने दिल्लीत घडामोडी घडत आहेत, त्यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तेच्या सारीपाटावर एखादा मोठा ‘धमाका’ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
यावेळी फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा केंद्रबिंदू ठरले ते भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन. दावोस दौऱ्यामुळे फडणवीसांना त्यांच्या पदग्रहण सोहळ्याला हजेरी लावता आली नव्हती. मात्र, काल अचानक नितीन नवीन यांच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी केलेली ही भेट केवळ शुभेच्छांपुरती मर्यादित नव्हती. बंद दाराआड झालेल्या या प्रदीर्घ चर्चेत महाराष्ट्रातील भविष्यातील राजकीय फेरबदलांची ‘स्क्रिप्ट’ लिहिली गेल्याचा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत.

अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) जी अस्थिरता निर्माण झाली आहे, त्याचे पडसाद आता सरकारमध्ये उमटू लागले आहेत. पक्षाच्या अध्यक्षपदावरून सुनेत्रा पवार समर्थकांमध्ये आणि दुसऱ्या एका गटबाज नेत्यामध्ये सुरू असलेली ‘सुंदोपसुंदी’ भाजपसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यातच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असून, तसे घडल्यास महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. हीच गळती रोखण्यासाठी आणि राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपच्या प्रभावाखाली ठेवण्यासाठी फडणवीसांनी दिल्लीत नवीन अध्यक्षांसोबत ‘प्लॅन-बी’वर चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दुसरीकडे, या दौऱ्यात अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या अनौपचारिक भेटींनंतर महाराष्ट्रात लवकरच मोठ्या प्रशासकीय किंवा राजकीय नियुक्त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरणे आणि राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांची सोय लावणे, यावरही दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. फडणवीस दिल्लीतून मुंबईत उतरताच सत्तेच्या समीकरणांमध्ये काही वेगवान बदल पाहायला मिळतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे हा दौरा केवळ एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *