प्रत्येक घराचा महोत्सव म्हणून रामटेक महोत्सव नावारूपाला आणू – वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल
सुदेश भोसले, साधना सरगम यांच्या गाण्यांवर रामटेकच्या रसिकांनी धरला ताल
▪️द बांसुरीवाला कनेक्ट च्या युवा ग्रुपने आपल्या गीतातून जागविले राष्ट्रप्रेम
▪️रसिकांचा भरभरून प्रतिसाद
नागपूर, दि. २ फेब्रुवारी: रामटेकचे राम मंदिर हे भोसले घराण्याने बांधले. आज एक भोसले दर्शन घेताना मला माझ्या मूळ घराच्या गाभाऱ्यात आल्याची भावना सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी व्यक्त केल्या. रामटेकच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभवस्थळांची माहिती व्हावी यासाठी या दोन्ही पार्श्वगायकांना श्रीराम मंदिर व इतर स्थळांवर वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी आवर्जून घेवून गेले. श्रीराम मंदिरावरील भोसले घराण्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी कृतज्ञतेने आपल्या भावना व्यक्त केल्या. सुदेश भोसले हे अष्टपैलू व्यक्तिमत्तचे धनी आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने आपण अनेक कलावंत रामटेक नगरीत आणले. पुढील वर्षापासून हा महोत्सव प्रत्येक घराचा हा महोत्सव म्हणून नावारूपाला आणू असे वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सुदेश भोसले व साधना सरगम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील बहारदार गाणे सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. इंतहा हो गई इंतजार की, ये जो मोहब्बत है, सारा जमाना, शावा शावा, अमिताभ बच्चन यांचे शराबी मधील डायलॉग, दादा कोंडके यांच्या अस्सल मराठी बाजातील आयो पासून यारी है ईमान यार मेरी जिंदगी अशा एकापेक्षा एक सरस सादरीकरणात सारे प्रेक्षागृह नृत्यात रममान झाले.
वातावरणातील आल्हाददायकता, नभातील पूर्ण चंद्राकडे रसिकांचे लक्ष वेधत साधना सरगम यांनी नीले नीले अंबर पर चाँद जब छा जाए या गीताने सुरुवात केली. हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार ज़िन्दगी में, हम ने घर छोड़ा है, टिप टिप बरसा पानी, जब छाए मेरी जादू अशी प्रेमगीते सादर करून त्यांनी रसिकांना जुन्या गीतातील आठवणींजवळ अलगत आणून ठेवले.सुरुवातीला द बांसुरीवाला कनेक्ट च्या युवा ग्रुपने आपल्या गीतातून राष्ट्रभक्तीपर गीते सादर करून राष्ट्रप्रेम जागवले.




