टॉप स्टोरी राजकारण

राज्यसभेच्या ‘त्या’ सहा जागांसाठी भाजपने टाकली गुगली; बिनविरोध निवडीच्या बदल्यात काँग्रेसच्या ‘बंटी’ पाटलांना मिळणार मोठं पद?

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या सहा जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच, भाजपने एक मोठी राजकीय चाल खेळल्याची माहिती समोर येत आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपने विधान परिषदेच्या रखडलेल्या विरोधी पक्षनेतेपदाचा ‘बुस्टर डोस’ मविआला दिल्याची चर्चा आहे. या गणितात काँग्रेसचे तगडे नेते सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर असून, आगामी काळात विधान परिषदेत मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
गेल्या सहा महिन्यांपासून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. अंबादास दानवे निवृत्त झाल्यानंतर दोन अधिवेशने उलटली, तरी या खुर्चीला वारसदार मिळाला नव्हता. मात्र, मे महिन्यात विधान परिषदेतील ९ जागा रिक्त होणार असून, त्यानंतर सभागृहातील संख्याबळाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. या ९ पैकी ८ जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता असताना, मविआच्या वाट्याला केवळ एक जागा येणार आहे. ही एकमेव जागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असली, तरी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर मात्र काँग्रेसने आपला दावा घट्ट केला आहे.
सध्याच्या संख्याबळानुसार काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे प्रत्येकी ६ सदस्य आहेत. महाविकास आघाडीतील अंतर्गत सूत्रानुसार, विधान परिषदेचे नेतृत्व काँग्रेसकडे सोपवण्याबाबत प्राथमिक सहमती झाल्याचे समजते. यामध्ये कोल्हापूरचे नेते सतेज पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. अभ्यासू वृत्ती आणि सरकारला धारेवर धरण्याची शैली यामुळे काँग्रेसने सतेज पाटलांच्या नावाला पसंती दिली आहे.
भाजपची ही ‘मोठी खेळी’ यशस्वी झाल्यास राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध पार पडतील आणि त्या बदल्यात सतेज पाटील यांच्या रूपाने विधान परिषदेला नवीन विरोधी पक्षनेता मिळेल. मे महिन्यातील ९ जागांच्या निवडणुकीनंतर हे समीकरण प्रत्यक्षात येण्याची शक्यता असली, तरी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आता सतेज पाटील यांच्या गळ्यात या पदाची माळ पडते की राजकारणात पुन्हा काही नवीन ट्विस्ट येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *