अजितदादांच्या वारशावरून राष्ट्रवादीत यादवी? तटकरे-पटेल यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, विलीनीकरणाच्या हालचालींनी महायुतीतही अस्वस्थता!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या राजकीय भविष्याबाबतचा सस्पेन्स अधिकच गडद झाला आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे पुनर्मिलन होणार की अजितदादांचा गट थेट भाजपमध्ये विलीन होणार, या प्रश्नावरून राजकीय धुरळा उडाला आहे. विलीनीकरणाच्या चर्चांना सुनील तटकरे यांनी जरी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला, तरी पडद्यामागे घडणाऱ्या हालचालींमुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. १२ फेब्रुवारीची तारीख या संदर्भात महत्त्वाची मानली जात असतानाच, तटकरे आणि पटेल यांच्या भूमिकेमुळे पक्षात दोन उभे गट पडल्याचे चित्र दिसत आहे.
शरद पवार गटाने या संघर्षात आता आक्रमक पवित्रा घेतला असून, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हे दोन्ही नेते स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी अजितदादांच्या नावाचा गैरवापर करत असून पक्षाला भाजपच्या हवाली करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ‘उबाठा’ आणि शरद पवार गटाकडून केला जात आहे. तटकरे सध्या आमदारांची ‘वन-टू-वन’ भेट घेऊन त्यांची मते जाणून घेत आहेत, मात्र या भेटी पक्षाला वाचवण्यासाठी आहेत की विलीनीकरणाचा मार्ग सुकर करण्यासाठी, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
उद्या होणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. रोहित पवार या वादात कोणते नवे पुरावे किंवा दावे सादर करतात, यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील पुढील संघर्षाची धार अवलंबून असेल. एका बाजूला साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल प्रस्थापितांना धक्का देणारे ठरले असतानाच, दुसऱ्या बाजूला राज्याच्या राजधानीत सुरू असलेल्या या ‘पॉवर गेम’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे की हा एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपापूर्वीचा शांत काळ आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
—
Deepak Kaitke




