टॉप स्टोरी राजकारण

मुंबईच्या रस्त्यांवर ‘टिपू सुलतान’चे नाव कोरले कुणी? भाजपच्याच जुन्या ठरावांनी हिंदुत्वाच्या भूमिकेची कोंडी होणार का?

​विशेष प्रतिनिधी | मुंबई,मालेगावमध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेला राजकीय वणवा आता मुंबईच्या रस्त्यांपर्यंत येऊन धडकला आहे. काँग्रेस नेत्यांच्या विधानांनी वाद आधीच पेटला असताना, आता मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या दस्तऐवजांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. आज ज्या टिपू सुलतानच्या नावावर भाजप आक्रमक भूमिका घेत आहे, त्याच टिपू सुलतानचे नाव मुंबईतील रस्त्यांना देण्यासाठी स्वतः भाजपच्याच नगरसेवकांनी पुढाकार घेतला होता का? हा प्रश्न आता मुंबईच्या राजकीय गल्लीबोळात विचारला जात असून, या ‘ऐतिहासिक’ पुराव्यांनी भाजपची मोठी अडचण केली आहे.
​या वादाचे मुख्य केंद्र आहे मुंबईतील गोवंडी आणि अंधेरी भागातील दोन रस्ते. २०१३ मध्ये गोवंडीतील शिवाजी नगर मार्ग क्रमांक ४ ला ‘शहीद टिपू सुलतान मार्ग’ असे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेत मांडला गेला. विशेष म्हणजे, हा प्रस्ताव मांडणारे सूचक भाजपचे नगरसेवक विठ्ठल खरटमोल होते आणि त्याला अनुमोदन देणारेही भाजपचेच अमित साटम होते. त्यावेळी महापालिकेच्या सभागृहात भाजपचे २१ दिग्गज नगरसेवक उपस्थित होते, पण टिपू सुलतानच्या नावावर एकानेही ब्र काढला नाही. उलट, हा ठराव बिनविरोध मंजूर करून त्याला ‘राजमान्यता’ देण्यात आली.
​असाच दुसरा धक्कादायक प्रकार अंधेरीच्या गिल्बर्ट हिल परिसरातील रस्त्याबाबत समोर आला आहे.

२००१ मध्ये या रस्त्याचे नाव ‘शेर-ए-म्हैसूर टिपू सुलतान मार्ग’ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यावेळीही भाजपचे विठ्ठल खरटमोल हेच सूचक होते आणि त्यांच्यासोबत काँग्रेसच्या मोहसीन हैदर यांनी हातमिळवणी केली होती. एकीकडे टिपू सुलतानला ‘हिंदुविरोधी’ ठरवून विरोध करायचा आणि दुसरीकडे स्वतःच्याच स्वाक्षरीने त्याचे नाव रस्त्यांना द्यायचे, हा भाजपचा दुटप्पीपणा आहे का? अशी टीका आता विरोधकांकडून होऊ लागली आहे.
​आताच्या बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये आणि आक्रमक हिंदुत्वाच्या काळात, स्वतःच्याच पक्षाने मंजूर केलेली ही दोन नावे भाजपसाठी ‘गळ्यातले हाड’ बनली आहेत. जुन्या फाईल्समधील हे सत्य चव्हाट्यावर आल्याने सत्ताधारी आता हे रस्ते बदलणार की आपल्याच जुन्या नेत्यांच्या निर्णयावर पडदा टाकणार? मुंबईच्या राजकारणात सध्या टिपू सुलतानच्या नावावरून सुरू झालेले हे ‘कागदपत्र युद्ध’ आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, भाजप या पेचातून कशी वाट काढणार याकडे सर्वांचे कुतूहल लागले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *