दोन महिन्यांपूर्वी रशियात येवजेनी प्रिगोझीन नावाच्या व्हेग्नर या खाजगी सेनेच्या प्रमुखाने रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात बंड केले होते. ही खाजगी सेना ज्या प्रिगोझिनची होती तो एक चिल्लर अपराधी होता. सोव्हिएत संघाच्या कारागृहात त्याला ९ वर्षे ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि खानपानाचे सामान विकणे सुरू केले. त्यानंतर त्याने रशियात अनेक रेस्टॉरंट उघडली. काही वर्षांपूर्वी त्याने व्हेग्नर समूहाची स्थापना केली होती. हा समूह म्हणजे खाजगी सैन्य होते. त्याच्या सैनिकांनी अनेक युद्धात भाग घेतला होता. पुतीन त्याच्या रेस्टॉरंटचे खास ग्राहक होते. या प्रिगोझिनला पुतीनचा शेफ म्हणण्यात येत होते. आताच्या ताज्या युक्रेन विरुद्धच्या लढाईत व्हेग्नरने हिस्सा घेतला होता. त्यानंतर जून महिन्यात या प्रिगोझिनचे काहीतरी बिनसले. आणि त्याने पुतीनविरुद्ध बंड केले. प्रिगोझिनच्या सैनिकांनी २३ जून रोजी रशियाच्या एका सैन्य मुख्यालयाला ताब्यात घेतले होते. पुतीनने त्यावेळी याला राजद्रोहाची उपमा दिली होती.
पाठीत खंजीर खुपसणाऱ्या प्रिगोझिनला आपण दंडित करू, असेही पुतीनने म्हटले होते. मात्र त्यानंतर पुतीन आणि प्रिगोझिन यांच्यात तह झाला आणि प्रिगोझिन बेलारूसला पळाला. एक वेळा पुतीनच्या नजरेतून जो उतरला तो सरळसरळ वरच जातो. आताची विमान दुर्घटना दुर्घटना नसून एक घटनाच आहे. प्रिगोझिन यांच्या बंडखोरीचा आणि राजद्रोहाचा बदला घेऊ आणि दोषींना दंडित करू, असे पुतीन बोलले होते. अशा प्रकारच्या कारवाईच्या बाबतीत पुतीन भलतेच सत्यवादी असतात. अनेक श्रीमंत उद्योगपती आणि पत्रकार जेलमध्ये आहेत. सोव्हिएत संघातही स्टॅलिनने अशाच प्रकारे कित्येक विरोधकांना वेगवेगळी कारणे दाखवून संपविले होते. सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यावर साम्यवादी सत्ता गेली पण त्याकाळी उच्चपदावर असलेले पुतीन यांना सत्ता मिळाल्यावर आजपर्यंत कोणीही खाली खेचू शकले नाही.
पुतीनचा क्रूरपणा सर्व जगाला ठाऊक आहे. त्यामुळे जेव्हा हे बंड झाले तेव्हा या बंडाचा म्होरक्या ८ दिवस जिवंत राहणार नाही अशी शंका व्यक्त करण्यात येत होती, ती खरी ठरली. सत्ता हाती आल्यावर आपले स्वत:चे महत्त्व आणि खुर्ची अबाधित राहावी म्हणून पुतीन यांनी जे घटनात्मक बदल केले आणि शेवटी स्वतः साठी आजीवन अध्यक्षपदाची सोय करून ठेवली त्यातून पुतीन यांच्या पराक्रमाची झलक येईल. आज रशिया युक्रेनच्या युद्धामुळे बेजार आहे. ज्या युक्रेनला २-४ दिवसात जिंकण्याची मनीषा बाळगून पुतीनने आक्रमण केले होते ते सपशेल फसले. यामुळे पुतीनला आता जरासाही संशय आला त्यानंतर जिवंत राहणे शक्य नाही. एकूणच पुतीन यांचा कारभार असाच हडेलहप्पी आहे. आज आपल्याविरुद्ध बंड करणाऱ्याला पुतीन संपवून टाकतील. पण तब्येत फारशी बरी नसलेले पुतीन पुढे आणखी कोणते पराक्रम करतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.