टॉप स्टोरी महाराष्ट्र

झिरवाळांच्या दालनातील ‘त्या’ ३५ हजारांच्या लाचेचा धडाका; खासगी सचिवाचे गाशा गुंडाळला, मंत्रालयात खळबळ!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनातच लाचेचे पैसे स्वीकारले गेल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर आता मोठी प्रशासकीय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात घडलेल्या लाचकांडाने सरकारची नाचक्की झाली असतानाच, झिरवाळ यांनी थेट त्यांचे खासगी सचिव (पीएस) डॉ. रामदास गाडे यांची हकालपट्टी केली आहे. मंत्र्यांच्या दालनात लिपिक राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजारांची लाच घेताना अटक झाल्यानंतर निर्माण झालेला दबावाचा विळखा सैल करण्यासाठी झिरवाळ यांनी हे धाडसी पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात घातलेल्या छाप्यात मंत्र्यांच्या दालनातील भ्रष्टाचाराचा चेहरा समोर आला होता. या प्रकारामुळे झिरवाळ यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती, तर स्वतःच्या पक्षातूनही त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आपला या व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे वारंवार सांगणाऱ्या झिरवाळ यांनी अखेर आपल्या कार्यालयातील सर्वात महत्त्वाच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यालाच कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला. डॉ. रामदास गाडे यांना १६ फेब्रुवारी २०२६ पासून त्यांच्या मूळ विभागात म्हणजेच कृषी व पदुम विभागात परत पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डॉ. गाडे हे पशुसंवर्धन विभागात सहायक आयुक्त असून ते प्रतिनियुक्तीवर मंत्र्यांचे ‘खासगी सचिव’ म्हणून काम पाहत होते. मात्र, या भ्रष्टाचार प्रकरणामुळे निर्माण झालेली संशयाची सुई आणि प्रशासकीय शिस्तीचा अभाव लक्षात घेऊन झिरवाळ यांनी त्यांना तातडीने पदमुक्त करण्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे. मंत्र्यांच्या या भूमिकेमुळे मंत्रालयात आता ‘स्वच्छता मोहिमे’ची चर्चा रंगली असून, एका लिपिकाने घेतलेली लाच थेट खासगी सचिवाच्या खुर्चीपर्यंत कशी पोहोचली, याबाबत अधिकारी वर्गात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *