नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर स्टेशन नजीक चेन्नई एक्सप्रेसला भीषण आग!
प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली ,वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला
सेलू :- संजय धोंगडे,नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर दहेगाव स्टेशन नजीक हेलोडी मार्गावर आज मंगळवारी सकाळी 11.45 वाजताचे दरम्यान नवी दिल्ली चेन्नई (जी टी) एक्सप्रेसचे मागील पार्सल बोगीला आग लागली ही बाब लगतच्या महीला व दिव्यांग बोगीतील प्रवाशांचे लक्षात येताच त्यांनी वेळीच उपाययोजना करण्यात आल्याने जीवितहानी टळली यात या पार्सल बोगीतील सर्व साहित्य जळून खाक झाले . सिंदी (रेल्वे) ते तुळजापूर स्थानकादरम्यान धावत्या नवि दिल्ली -चेन्नई एक्सप्रेस (ग्रँड ट्रंक एक्सप्रेस)- कोच क्रमांक २१५९६९/C) च्या शेवटच्या बोगीला भीषण आग लागली. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे या घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे.
आज मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास सिंदी ते तुळजापूर दहेगाव स्टेशन पासून 2किलोमीटर अंतरावर पोल नंबर ७८४/१९ व ७८४/१७ च्या दरम्यान शेवटच्या ‘दिव्यांगजन’ बोगीमधून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. या बोगीमध्ये साधारण १० प्रवासी प्रवास करत होते. बोगीमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी तातडीने रेल्वेची साखळी ओढून गाडी थांबवली. रेल्वे गार्ड डी. आर. मीना यांनी तातडीने खाली उतरून पाहणी केली आणि आग लागल्याची खात्री पटताच ड्रायव्हरशी संपर्क साधला. आगीचा धोका वाढू नये म्हणून लागलीच प्रभावित बोगी इतर डब्यांपासून वेगळी करून रेल्वे गाडी सुरक्षित अंतरावर नेण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच दहेगाव (गोसावी) पोलीस स्टेशनचे पीएसआय यशवंत कदम आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तसेच सिंदी व सेलू पोलीसही मदतीला धावले. पोलिसांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. तसेच आगीची माहिती मिळताच सिंदी, सेलू आणि हिंगणघाट येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सिंदी येथील अग्निशमन दलाने प्रथम पोहोचून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने तासाभरात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रेल्वे प्रशासनाकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, या घटनेमुळे नागपूर-सेवाग्राम मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. दुपारी 1.30 वाजतानंतर या मार्गावरील विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक सेवा सुरळीत चालू करण्यात आली घटनेची माहिती मिळताच नागपूर लोहमार्ग पोलीस, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली.




