वडिलांच्या सहवासात लहानपणापासूनच समाजसेवेचे आलेले भान आणि जगतमित्र असा स्वभाव सदासर्वदा जपणारे ख्यातनाम दिवाणी वकील विवेक खरे हिच संवेदनशीलता आपल्या व्यवसायातही जपतात. हातात पेन घेऊन केस ड्राफ्ट करण्याआधी दिल्या जाणाऱ्या सल्ल्यासाठीही जिथे मोठी रक्कम मोबदला म्हणून घेतली जाते तिथे हे सल्ले विनामूल्य देणारे ॲड. विवेक खरे हे अडचण घेऊन येणाऱ्याकडे केवळ आपला अशिल म्हणून पाहत नाही तर त्याच्या दुःखात सहभागी होत त्याला न्याय कसा देता येईल याचा व्यवसायापलीकडे जात ते विचार करतात.
अंबरनाथ सारख्या ग्रामीण भागातून सिविल केसेस हाताळत त्यांचा सुरू झालेला प्रवास आता जमिनीचे वाद आणि सिविल केसेस मध्ये राज्यातील निष्णात वकील म्हणून रूपांतरित झालेला आहे. आपल्याला पूर्ण न्याय मिळेल या आशेने त्यांच्याकडे आलेला प्रत्येक पक्षकार मला दुसरा वकील करायचा आहे म्हणून आजपर्यंत कधीही परत गेलेला नाही.
अल्ब्राईट मोरारजी केमिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये कामाला असणारे आणि सोबतच बांधकामाचा व्यवसाय करणारे वडील विजय खरे आणि आई माधवी खरे यांच्या संस्काराच्या सावलीत विवेक खरे लहानाचे मोठे झाले. वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आणि भाजपचे नगरसेवक या नात्याने राजकीय पातळीवर सक्रिय कार्यकर्ते होते.त्यांचे विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी व कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध होते. अनेक गरजू लोक आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येत आणि त्यांचे वडील त्या सोडवित असत. वडिलांच्या या सामाजिक बांधिलकीचा वसा विवेक खरे यांनी आपल्या व्यवसायामध्ये जपला.
मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केमिस्ट्री मध्ये बीएससी केले. ते सांगतात की वडिलांच्या बांधकाम व्यवसायातून संपर्कात आलेले प्रख्यात गायनॅकॉलॉजिस्ट यांनी वकिली करण्याचा सल्ला दिला आणि मी एल.एल.बी. चे शिक्षण पूर्ण केले.
राजकीय पार्श्वभूमी असतानाही कायद्याच्या शिक्षणाकडे वळणारे विवेक खरे म्हणतात की जनप्रतिनिधी म्हणून राजकारणात प्रवेश करणाऱ्यांचे अंतिम ध्येय हे समाजकारणच असते पण आजकाल अर्थकारणही आहे. हीच जनसेवा वकिली व्यवसायामध्ये कायद्याच्या चौकटीत बसून करण्याची संधी मिळते. वडिलांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे झालेल्या प्रचंड जनसंपर्काचा फायदा वकिली व्यवसायात झाला असे ते म्हणतात.
2004 मध्ये त्यांनी अंबरनाथ येथे जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा मुंबईपासून जवळ असलेल्या या ग्रामीण भागामध्ये शेतीचे वाद, जमिनीचे वाद, शेती विषयक प्रश्न घेऊन गावकरी त्यांच्याकडे येत असत. मोबदला देण्याची ऐपत नसलेले शेतकरी मिळालेल्या न्यायाच्या बदल्यात त्यांना शेतात पिकलेली भाजी, डझनभर अंडे आणून देत. पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे जे समाधान मिळायचं ते आजच्या भरघोस मोबदल्यात सुद्धा मिळत नाही असे ते प्रामाणिकपणे सांगतात.
निरीक्षण आणि स्वअनुभवातून माणूस घडत जातो यावर विश्वास असलेले खरे यांनी कोणत्याही सीनियर वकिलाकडे ज्युनिअरशिप केलेली नाही. कायद्याचा सखोल अभ्यास, तर्कशुद्ध युक्तिवाद, आणि आपल्या पक्षकाराला शंभर टक्के न्याय मिळवून द्यायचा या प्रामाणिक प्रयत्नातून ते आज विविध शेतीचे वाद, जमिनीचे वाद, करार विषयक वाद, घरमालक भाडेकरू वाद, मालमत्तेचे वाद असे सिव्हिल केसेस यशस्वीपणे हाताळतच नाही आहेत तर निष्णात सिविल लॉयर म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली आहे.
एका आव्हानात्मक केस बद्दल उल्लेख करताना ते भारावून जातात आणि किस्सा सांगतात की एकदा मजबूत शरीरयष्टि असलेला आर्मी ऑफिसर त्यांच्याकडे आला. ते आर्मीमध्ये महारेजिमेंट मध्ये कनिष्ठ पदावर सेवा देत होते.आर्मीमध्ये असल्याचे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा लगेच खरे यांनी त्यांना आश्वस्त केले की आपण सीमेवर देशासाठी काम करीत असल्याने नैतिक जबाबदारी म्हणून मी आपल्याकडून शुल्क घेणार नाही. त्यांनी त्यांची आपबिती सांगितली. चांभार जातीच्या असलेल्या त्या व्यक्तीचा ब्राह्मण असलेले त्यांचे उच्च पदस्थ कर्नल नेहमी त्यांना जातीवरून अपमानित करीत. एकदा त्यांनी दारूच्या नशेत त्या आर्मी ऑफिसरच्या खांद्यावरील स्टार्स उडविले.हे करण्याचे अधिकारी केवळ राष्ट्रपतीलाच असतात किंवा एखाद्या देशद्रोहीला शिक्षा म्हणून असे केल्या जाते. हा प्रसंग त्यांचे नैतिक अध:पतन करणारा ठरला. अत्यंत अपमानित अवस्थेत आलेले आर्मी ऑफिसर यांनी जेव्हा खरे यांना न्यायाची मागणी केली तेव्हा यावर नक्कीच तोडगा काढल्या जाईल असे आश्वासन देत या केसचा पुरेपूर अभ्यास केला. आणि भारतीय लष्कर प्रमुख, सन्यकल्याण महिला संघ आणि भारताचे माननीय राष्ट्रपती यांना सदरचा प्रकार कायदेशीर रित्या लेखी कळवला. ही तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून संबंधित कर्नलकडून एकदा विनंती झाली. पण ते मागे हटले नाही. शेवटी राष्ट्रपती आणि आर्मी चीफ कडून या केसची दखल घेण्यात आली. आणि कर्नल यांचे तीन स्तर डिमोशन करण्यात आले आणि त्या ऑफिसरला पाहिजे तिथे पोस्टिंग देण्यात आली. ही केस जेवढी आव्हानात्मक होती तेवढेच आत्मिक समाधान देणारी होती असे ते म्हणतात.
कायद्याचा वाद हा एका नोटीस पासून सुरू होतो आणि तो सुप्रीम कोर्टात संपतो. संपूर्ण प्रक्रियेमध्ये तयार होणारी नोटीस ही शेवटपर्यंत कायम असते आणि तेवढीच महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे वकिली व्यवसायात लीगल ड्राफ्टिंग म्हणजेच कायदेशीर मसुदा तयार करणे हे सर्वात महत्त्वाचे असून त्यामध्ये आपण कौशल्य अवगत केल्याचे ते मोठ्या अभिमानाने सांगतात.
आलेला पक्षकार जर गरीब असेल, मोबदला देण्याची ऐपत नसेल तर प्रसंगी कमी शुल्क घेणारे संवेदनशील मनाचे विवेक खरे हातात पेन घेऊन केस ड्राफ्ट करण्याआधी दिल्या जाणाऱ्या सल्ल्यासाठीही जिथे भरघोस मोबदला घेतला जातो तिथे ते हे सल्ले विनामूल्य देतात.
सततचे नव्हे आव्हान, या क्षेत्रातील प्रचंड दबाव, सतत करावा लागणारा कायद्यांचा अभ्यास या कसोटीवर खरे उतरत शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये या तत्त्वावर चालणाऱ्या भारतीय न्यायव्यवस्थेत आपल्या पक्षाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची अखंड लढाई सुरू आहे.
सर्वच क्षेत्रांमध्ये व्यावसायिकरणाचा शिरकाव झालेला असताना व्यवसायापलीकडे जाऊन विवेक खरे यांनी आपल्या व्यवसायाला संवेदनशीलतेच्या कोंदणात तेजांकित केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचा हा व्यवसाय असाच तेजांकित होत राहो आणि यशाचे शिखर गाठो यासाठी आमच्या अनेक अनेक शुभेच्छा.





