माणूसपणाची पाऊलवाट

विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आरशातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा, शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी दूरदृष्टी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे अंधश्रद्धेविरोधात विवेकी समाज घडवण्याचे ध्येय समोर ठेवले. प्रवाहाच्या विरोधात जाऊन, मुठभर कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी एक वैचारिक चळवळ उभी केली. विवेकाच्या आरशात समाजाने स्वतःकडे पाहावे, अंधश्रद्धेची कीड ओळखावी आणि ती समूळ नष्ट करावी,यासाठी त्यांनी समाजमन जागे केले.

शिक्षणामुळे अंधश्रद्धा नष्ट होतील, अशी अपेक्षा असतानाही सुशिक्षित माणूससुद्धा अंधश्रद्धेचा बळी ठरून आपले आयुष्य उद्ध्वस्त करत होता. या अस्वस्थ करणाऱ्या वास्तवातून समाजाला बाहेर काढायचे असेल, तर प्रसंगी जीवही पणाला लावावा लागेल, असा दृढ निश्चय माधव बावगे यांनी केला.
सत्य, नीती आणि विवेकी विचारांच्या कसोटीवर उभे राहून माधव बावगे यांनी स्वीकारलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा मार्ग खरोखरच सोपा होता का? निखाऱ्यावर चालण्याइतके कठीण असलेले हे कार्य आणि असामाजिक शक्तींच्या हिंसक विरोधाला सामोरे जाण्याची ताकद त्यांना कुठून मिळाली,असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या बालपणीच्या वेदनादायी अनुभवांत दडलेले आहे.

लातूर जिल्ह्यातील आटोळा या गावी, पद्मिनबाई विश्वनाथ बावगे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ‘अठरा विश्व दारिद्र्य’ म्हणतात त्यापेक्षाही भयावह दारिद्र्य त्यांच्या वाट्याला आले. अंधश्रद्धा, कर्मकांड, उपास-तापास, नवस-सायास, आजारपणात बुवाबाबा-देवीदेवतांच्या वाऱ्या,अशा प्रथांनी ग्रासलेल्या कुटुंबात कबाड कष्ट करून पोट भरणे, हाच रोजचा यक्षप्रश्न होता.

माधव बावगे हे आपल्या घरातील पहिले शिकलेले व्यक्ती. त्यांचे प्राथमिक शिक्षण आईच्या माहेरी बोकणगावी झाले; माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना पुन्हा आटोळ्याला यावे लागले. आटोळा गावात अर्धी वस्ती मुस्लिम आणि इतर धर्मीयांची होती. मात्र धर्म कोणताही असो,अज्ञान, दारिद्र्य, अगतिकता आणि भीती यामुळे हे गाव अंधश्रद्धेच्या शापाखाली होते.

करणी-भानामती, देवी अंगात येणे, भूतबाधा, डाकिणी, बुवाबाबांचे चमत्कार, अंगठीतील खड्यांमुळे किंवा नरबळीमुळे फलप्राप्ती, जन्मकुंडली-प्रारब्ध-नशीब यांसारख्या बुरसटलेल्या कल्पनांनी समाज गुदमरला होता. या अंधश्रद्धांमुळे आयुष्याची राखरांगोळी होताना पाहून माधव बावगे यांच्या विवेकबुद्धीला सतत धक्का बसत राहिला.

एकीकडे या प्रथा, तर दुसरीकडे टोकाचे दारिद्र्य—यामुळे अनेकदा शाळा बुडवून त्यांना कामाला जावे लागे. आठ बैलांचा नांगर चालवणे, गुराळात व विहीर खोदण्याच्या गुत्यात काम करणे, शेतीमजुरी, गिट्ट्या फोडणे, आई आजारी असताना घरकाम सांभाळणे,अशा जबाबदाऱ्या लहान वयातच त्यांच्या खांद्यावर आल्या. तरीही १९७३ साली त्यांनी दहावीची परीक्षा ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली.

यानंतर लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात वाणिज्य शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. प्राचार्य डॉ. जे. एस. वाघमारे, प्रा. अनिरुद्ध जाधव आणि प्रा. आर. एल. कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना वसतिगृह व कार्यालयातील कामाची जबाबदारी देण्यात आली. याच माध्यमातून निवास व भोजनाची सोय झाली. प्रा. आर. एल. कावळे यांनी तर त्यांचे शैक्षणिक पालकत्वच स्वीकारले.

एनएसएसच्या माध्यमातून प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांच्यासोबत त्यांनी बाबा आमटे यांच्या श्रमसंस्कार शिबिरात सहभाग घेतला. “गावातील समस्या सोडवण्यासाठी तुझी गरज गावात आहे,” हे बाबा आमटे यांचे शब्द त्यांच्या जीवनाला दिशा देणारे ठरले. श्रमसंस्कार शिबिर समन्वयक म्हणून काम, साहस सहली, पंजाब एकता अभियान, भारत जोडो सायकल यात्रा,या साऱ्या अनुभवांतून सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांच्या रोमरोमात भिनली.

‘कमवा आणि शिका’ योजनेत काम करत असतानाही ते वर्गात नेहमी अव्वल राहिले आणि बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे महाविद्यालयात कार्यालयीन पद मिळाले. नोकरी सांभाळत असतानाच राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, समाजभारती, राष्ट्रीय युवा योजना, जिल्हा साक्षरता अभियान, व्यसनमुक्ती, रक्तदान व अवयवदान चळवळींत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

याच काळात लातूर येथे रोटरी क्लबच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे तीन दिवसांचे शिबिर आयोजित झाले. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे जे धडे दाभोळकरांनी दिले, त्यांचा माधव बावगे यांच्यावर खोलवर परिणाम झाला. लहानपणापासून अंधश्रद्धेने पोखरलेला समाज पाहिल्याने त्यांच्या मनातील संघर्षाला स्पष्ट दिशा मिळाली. “सत्य काय आणि आपण कोणत्या अज्ञानात जगतो?” या प्रश्नाने त्यांना ग्रासले आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले.
या चळवळीतून २५००हून अधिक व्याख्याने, ७००हून अधिक करणी,भानामती प्रकरणांचे निरसन, ३६० आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह सत्यशोधकी पद्धतीने, ३ नरबळी

प्रकरणे व ५ पशुहत्यांचे प्रयत्न थांबवणे, १२ पोतराजांना प्रथेतून मुक्त करणे, राज्य व जिल्हास्तरावर २६ मोहिमा आणि ४० परिषदांचे आयोजन,असे प्रचंड कार्य उभे राहिले. हे काम अनेक विवेकवादी कार्यकर्त्यांच्या सहभागातून शक्य झाले, असे ते नम्रपणे सांगतात.
डॉ. दाभोळकर यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या हिंसक विरोधाच्या काळात “आम्ही सारे दाभोळकर” या भावनेतून जुने-नवे कार्यकर्ते अधिक एकत्र आले. धमक्या, हल्ले, पोलीस ठाण्यातील नजरकैद, पेट्रोल टाकून जाळण्याचे प्रयत्न, गोळ्या झाडण्याच्या धमक्या,हे सर्व सहन करूनही ते डगमगले नाहीत.
१९९३ पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सक्रिय राहून त्यांनी २०२२-२५ या काळात राज्य कार्याध्यक्ष आणि सध्या राज्य अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. डॉ. दाभोळकरांच्या काळातील १८० शाखा आज ३५०हून अधिक झाल्या आहेत.

भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका सामाजिक प्रबोधन पुरस्कार, डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार, शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर पुरस्कार, शाहू भूषण पुरस्कार आणि आता बाबा आमटे राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार २०२६, अशा अनेक सन्मानांनी त्यांचे कार्य गौरवले गेले आहे.
तरुण आणि महिलांची विवेकाधारित संख्या वाढवणे, अध्यात्मिक बुवाबाजीला रोखणे, मूल्यपरिवर्तन घडवणे आणि जादूटोना विरोधी कायदा केंद्रात मंजूर करवून घेणे,ही त्यांची पुढील पंधरा वर्षांची ध्येये आहेत.
सत्य, विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मार्गावर समाजाला कलंक ठरणाऱ्या अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त करण्याच्या या प्रवासात त्यांना अखंड यश लाभो,याच मनःपूर्वक शुभेच्छा.

माधव बावगे संपर्क क्रमांक
9422469564

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *