श्रमसंस्कार शिबिरांतून देशाचा दीपस्तंभ असलेल्या युवकाच्या मनाची मशागत करून त्याच्यातील आत्मशक्तीची धग पेटविणारा आणि या माध्यमातून गावखेड्यांची स्वयंपूर्णता या जाणिवेतून आणि नेणीवेतून ज्यांची वयाच्या 84 व्या वर्षीही अखंड वाटचाल सुरू आहे असा झंझावात म्हणजे डॉ. प्रा. सोमनाथ रोडे. वर्तनातून परिवर्तन घडविण्याची ताकद असणाऱ्या युवकाचा आवाज बुलंद करणाऱ्या डॉ. सोमनाथ रोडे यांचा प्रवास थक्क करणारा आणि तेवढाच दिशादर्शक आहे.
कर्मयोगी डॉ.बाबा आमटे यांच्या मौलिक विचारांचा सदैव पगडा असणारे डॉ.प्रा. सोमनाथ रोडे हे बालपणीच मातृ सुखाला मुकले पण ममत्व काय असते हे त्यांच्या सामाजिक कार्यातून दिसून येतं. ते म्हणतात आईच्या खांद्यावर असलेल्या मुलाचे ओझे हे आईसाठी ओझे नसून उदात्त, हवेहवेसे, निखळ अशी जाणीव आहे. आणि समाज म्हणजे आईच्या खांद्यावरील एक मुल आहे. याच भावनेने समाजसेवेचे व्रत घेणारे डॉ. सोमनाथ रोडे यांचा जन्म शंकरअप्पा रोडे व प्रयागबाई रोडे यांच्या पोटी शेतकरी कुटुंबात झाला. आई लहानपणीच वारल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या आजोळी परळी वैजनाथ येथे झाले.
प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पीपल्स कॉलेज नांदेडला बीएपर्यंतची शिक्षण झाले. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एमए पर्यंतचे शिक्षण घेतले. अहमदपूर तालुका येथील एका महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर 1970 ला महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथे प्राध्यापक, इतिहास विभाग प्रमुख, उपप्राचार्य व प्राचार्य म्हणून 37 वर्षांची सेवा दिली. येथे त्यांनी लाईफ अँड वर्क ऑफ बाबा आमटे या विषयावर पीएचडी केली. बाबा आमटे यांच्यावर पीएचडी करणारे ते पहिले आहेत असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात.
प्राध्यापक म्हणून काम करीत असताना एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मशक्तीचा साक्षात्कार करीत त्यांच्यातील श्रमशक्तीचा वापर करीत गावखेडी स्वयंपूर्ण करण्यामध्ये त्यांनी आपले आयुष्य वेचले. या कार्याची बीजे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातच पेरल्या गेली. नांदेडला शिकत असताना नरहर कुरुंदकर, गाडगीळ, के.आर.शिरवाडकर असे प्रख्यात प्राध्यापक त्यांना शिकवायला होते. त्यांच्या विचारसरणीच्या मुशीत त्यांचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होत गेले. आणि त्याच काळात नरहर कुरुंदकर यांच्या माध्यमातून डॉ.बाबा आमटे यांच्या श्रमसंस्कार शिबिराचा अनुभव घेता आला. त्यांचे विचार, जीवनाकडे बघण्याची समग्र दृष्टी, त्यातून आलेले समाजसेवेचे भान, युवा संस्कार या सर्व गोष्टी जवळून बघता आल्या आणि त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या जीवनावर सदैव राहिला.
ते मोठ्या अभिमानाने सांगतात की 1968 पासून 2024 पर्यंत झालेल्या श्रमसंस्कार शिबिराचा मी साक्षीदार आहे. हीच श्रमसंस्कार शिबिरे त्यांनी महाविद्यालयांमध्ये एनएसएसच्या माध्यमातून सुरू ठेवली. त्यांनी केलेल्या या योगदानातून औरंगाबाद येथे विद्यार्थी कल्याण संचालक व राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक या पदावर ते सहा वर्ष होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी युवकांची अनेक शिबिर घेतली. गावामध्ये साधी आणि सुलभ शौचालये बांधली. नांदेड येथील नेरली या कुष्ठरोग प्रकल्पाची त्यांनी निव बांधली. तेथील विविध विद्यालयातील युवकांना एकसंघ करीत त्यांचे सतत तीन महिने येथे शिबिर लावले आणि या प्रकल्पासाठी आवश्यक पाया बांधणी केली. ते गौरवाने सांगतात सतत तीन महिने शिबिर लावणे हा त्या काळचा पहिला उपक्रम होता.
विद्यार्थ्यांमध्ये साहित्य विषयक रुची वाढावी म्हणून त्यांनी दहा दिवसीय ग्रामीण आत्मकथन शिबिर, यदुनाथ थत्ते, एस.एन. सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनाखाली रचनात्मक आणि श्रमाचे महत्त्व निषद करणारे शिबिरे घेतले. या सोबतच लोकनायक जयप्रकाश नारायण आणि विनोबा भावे यांच्या सर्वोदय चळवळीच्या माध्यमातून 56 दिवसांची पदयात्रा काढली. या पदयात्रेमध्ये पाणी संवर्धन, माती संवर्धन, शोषखड्डे, अशा विविध समस्यांना त्यांनी हात घातला. स्वयंपूर्ण खेडी हा देशाचा श्वास असतो. खेड्यांच्या विकासाची धुरा सांभाळणारे ग्रामसभा आणि ग्रामपंचायत महत्त्वाचा भाग असून त्याच्या शक्तीकरणावर त्यांनी जोर देत आपल्या व्याख्यानातून आणि सभांतून सशक्त गावाचे विचार मांडले . हे करीत असताना गावांमध्ये सहिष्णुता विकसित केली.अनिस च्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचेही ते प्रयत्न करतात.
श्र
मसंस्कार शिबिरातून युवकांचे आत्मभान जागृत करीत असतानाच प्राध्यापक ते प्राचार्य या प्रवासामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविलेच नाही तर कित्येक विद्यार्थी आज प्राचार्य या पदाला साजेसे असे जीवन जगत आहेत. प्राध्यापक सोमनाथ रोडे यांनी लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक विभूतींच्या व्यक्तिमत्त्वावर हजारोंच्या वर व्याख्याने दिली आहेत. विविध ऐतिहासिक पुस्तकांचे त्यांनी लेखन व प्रकाशन केले आहे. इतिहासावरील अभ्यासक्रमाची विविध पुस्तके ही त्यांनी लिहिलेली आहे.
वयाच्या 84 व्या वर्षीही सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या समाजकार्याचा आणि झपाटून काम करण्याचा वेग अचंबित करणारा आहे. विविध पदावर आरुढ असणारे आणि विविध पुरस्कारांचे मानकरी ठरलेले रोडे आपल्या अनुभव विश्वातून सांगतात की गावाचा विकास हा कोणत्याही पुढाऱ्यावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन करावा. ग्रामसभा आणि ग्राम पंचायत यांना कार्यान्वित करण्यासाठी गावकऱ्यांचा अंकुश असणे आवश्यक आहे. ते युवकांना मार्गदर्शन करतात की तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात तेव्हा स्वतःला ओळखा आणि कार्यप्रवण व्हा. यावेळी वृत्तपत्राच्या माध्यमातून ते सांगू इच्छितात की माध्यमे ही समाजाचे प्रतिबिंब आहे. येथे ज्याही चांगल्या विकासात्मक गोष्टी घडतात त्याला माध्यमांमध्ये जागा मिळणे आवश्यक आहे जेणेकरून समाजावर त्याचा प्रभाव पडेल.
आपल्या दमदार कार्यशैलीतून आणि नेतृत्वातून त्यांनी केवळ समाज उभारणीच केली नाही तर माणुसकीचे नाते निभाविले आहे.युवकांमध्ये आत्मशक्तीचा जागर आणि त्यातून गाव समृद्धी हा त्यांचा प्रवास अखंड यशाच्या मार्गावर राहो यासाठी आमच्या अनेक अनेक शुभेच्छा.





