पुणे एक्सप्रेस-वेवरील ‘त्या’ ट्रॅफिक जॅममुळे कुणाला मिळाला दिलासा आणि कामरा-अंधारेंचे पुढे काय होणार?
मुंबई प्रतिनिधी:राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या हक्कभंग प्रकरणाच्या सुनावणीत एक नाट्यमय वळण आले आहे. विधिमंडळाच्या रडारवर असलेले प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा, शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे या तिघांविरोधातील हक्कभंगाची कारवाई तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. यामागे ‘ट्रॅफिक जॅम’ हे एक अनपेक्षित कारण ठरले असून, आता सर्वांचे लक्ष पुढील आठवड्याकडे लागले आहे.
नेमके काय घडले?
अहिल्यानगर (नगर) जिल्ह्यातील सूर्यकांत मोरे यांच्यावर बुधवारी हक्कभंगाची सुनावणी होणार होती. या सुनावणीसाठी मोरे तातडीने मुंबईकडे निघाले खरे, मात्र पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका त्यांना बसला. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने त्यांनी विधीमंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली अडचण कळवली. ही अपरिहार्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांची सुनावणी १६ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलली आहे.
मोरे यांच्यावर २३ नोव्हेंबर रोजी जामखेड येथील निवडणूक प्रचारात विधानपरिषदेचे कामकाज आणि सभापतींबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हक्कभंग मांडण्यात आला होता.
कामरा आणि अंधारे यांचे काय?
दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारे विडंबनात्मक गाणे गाणारे कुणाल कामरा आणि तेच गाणे त्याच अंदाजात बोलून दाखवणाऱ्या सुषमा अंधारे यांची सुनावणी आज (गुरुवारी) नियोजित होती. मात्र, ही सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली असून आता ती १७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.
—
Deepak Kaitke




