अमरावती टॉप स्टोरी विदर्भ

अमरावतीत माणुसकीला काळिमा; पाच नराधमांनी शाळकरी मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, आता तरी न्याय मिळणार का?

विशेष प्रतिनिधी:अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय निष्पाप शाळकरी मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला हा प्रकार केवळ गुन्हा नसून समाजाच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवणारा आहे.

शाळेतून घरी जाणाऱ्या या अल्पवयीन मुलीला “तुझे मुलांसोबत लफडे आहे, आम्ही तुझी बदनामी करू” अशी नीच धमकी देऊन साईनाथ आणि अजिंक्य या दोन आरोपींनी तिला रस्त्यात अडवले. या नराधमांनी पीडितेला विरूळ रॉघे मार्गावरील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही नृशंसता इथेच थांबली नाही; त्यानंतर कार्तिक शेलोकार, साहिल आणि संकेत काळे हे तिघे तिथे पोहोचले आणि त्यांनीही त्या मुलीवर आळीपाळीने अत्याचार केले. या पाचही नराधमांनी मुलीला सतत धमकावत तिच्या असहायतेचा फायदा घेतला आणि वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.

या सततच्या अत्याचारामुळे ती अवघ्या १६ वर्षांची मुलगी आज ३ महिन्यांची गरोदर आहे. आरोपींच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडितेने हिंमत एकवटली आणि पोलीस ठाणे गाठले. वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी या नराधमांविरोधात पोक्सो (POCSO) आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असली, तरी या घटनेने समाजातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या नराधमांना कठोर शिक्षा देऊन पीडितेला न्याय कधी मिळणार, हाच सवाल आता विचारला जात आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *