होळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात पडणार ‘गुलाल’? रखडलेल्या निधीसाठी ९८ कोटींचा मार्ग मोकळा!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या, तो क्षण अखेर जवळ आला आहे. तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागाने सुमारे ९८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे रखडलेल्या हप्त्यांचा मार्ग मोकळा झाला असून येत्या आठवड्याभरात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे.
दोन हप्ते एकत्रित मिळणार?
फेब्रुवारी महिना संपत आल्याने आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे की त्यांना १५०० रुपये मिळणार की ३०००? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच ३००० रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. ज्या लाभार्थ्यांच्या अर्जात त्रुटी होत्या किंवा ज्यांचे मागील काही हप्ते तांत्रिक कारणांमुळे जमा झाले नव्हते, अशा महिलांना सर्व थकबाकीसह ६००० रुपयांपर्यंतची रक्कम एकाच वेळी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
ई-केवायसीचा अडथळा दूर करा
हा निधी थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात (DBT) जमा केला जाणार आहे. मात्र, ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही, त्यांना या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. सरकारने यापूर्वीच २१ लाख संशयास्पद अर्जांची पडताळणी पूर्ण केली असून, आता केवळ पात्र महिलांच्या खात्यातच हा निधी वर्ग केला जाणार आहे. होळीच्या सणापूर्वी महिलांच्या हातात पैसे देऊन सरकार त्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे.




