रानकवी महानोर!

आज सकाळी महाराष्ट्राचे निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. महानोर क्षणाचे कवी होते, काही क्षणांचे लेखक होते. परंतु ते जीवनभर शेतकरी होते. ते उत्तम गीतकार होते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. जैत रे जैत, विदूषक आणि इतर अनेक चित्रपटांतील त्यांची गीते चांगलीच गाजली होती. त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी देशात भारत छोडो आंदोलनाची घोषणा महात्मा गांधी यांनी केली होती त्या १९४२ साली झाला होता. साहित्य आणि राजकारणात ते महाराष्ट्राच्या मातीचे कवी होते. त्यानंतर आपले जन्मगाव पळसखेड आणि तेथील शेती अत्यंत प्रिय होती. अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले होते. परंतु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीला त्यांचा विरोध होता. त्यामुळेच मराठी संमेलनाचे अध्यक्ष त्यांना होता आले नाही.

राजकारणात त्यांना १९७८ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आणून अध्यक्ष केले होते. ते राजकारणात असले तरी त्यांचे साहित्यावर आणि शेतीवर सतत लक्ष असायचे. आम्ही वर म्हटल्याप्रमाणे त्यांचा जीव शेतीतच रमायचा. यामुळेच त्यांच्या गीतलेखनात ग्रामीण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या छटा अत्यंत मनोहर रूपात दिसायच्या. त्यांनी कवितेशिवाय साहित्य प्रांतातील कथेपासून कादंबरीपर्यंत लिखाण केले आहे. लोककला आणि लोकगीतांचे संपादन त्यांनी केले. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना १९९१ साली पद्मश्रीने गौरविण्यात आले. खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याला मिळणारा कृषिभूषण पुरस्कार त्यांना १९८५ साली मिळाला. वनश्री पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार त्यांच्यामागे आपोआपच चालत आला. १९७८ साली आमदार झाल्यावर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या नेत्यांवर लिखाण केले.

यशवंतराव चव्हाण आणि मी लिहिताना त्यांनी यशवंतराव कसे रसिक आणि साहित्यप्रेमी आहेत याचा उलगडा केला. शरद पवार यांनी तर त्यांना आमदार केले होते. त्यांच्याशी असलेले संबंध त्यांनी उलगडून दाखविले होते. शेतीसोबतच पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी लिखाण केले. एकूणच महाराष्ट्राच्या साहित्यसृष्टीवर त्यांनी जो ठसा उमटविला तो महाराष्ट्रातील जनमानसाचे लक्ष आकर्षित करणारा ठरला. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. पुण्याच्या रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते. तिथेसुद्धा त्यांनी आपल्याला लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन जा, असा लकडा लावला होता. थोडक्यात त्यांना आपल्या भविष्याचा आभास झाल्यामुळे आपल्या आवडत्या शेतातच आपण अखेरचा ेशास घ्यावा असे त्यांच्या मनिमानसी होते. त्यांची तब्येत सुधारण्याची आशा असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. पण जीवनाच्या क्षणभंगुरतेला कोणीही अडवू शकत नाही. त्यांचे साहित्य, त्यांची गीते, त्यांचे राजकारण आणि त्यांची आवडती शेती यांना विरह – वेदना देऊन कवी ना. धों. महानोर आपल्या लिखाणाच्या रूपाने सदैव जिवंत राहतील यात शंका नाही. ते आमदार असताना आणि नंतरही विविध ठिकाणी त्यांच्याशी बोलण्याचा योग आल्यावर माणूस म्हणूनही ते मोठेच होते. अशा या निसर्गकवीला आमची श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *