मुंबई

सनई-चौघड्याचा निनाद आणि तुतारीचा ललकार; विधान भवनात शिवरायांच्या राजवैभवी सोहळ्याची प्रचिती!

मुंबई, विशेष प्रतिनिधी:विधीमंडळाच्या प्रांगणात आज सकाळी एक वेगळेच चैतन्य पाहायला मिळाले. निमित्त होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे. विधान भवनातील महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासमोर पार पडलेल्या या अभिवादन सोहळ्याने शिवरायांच्या राजवैभवी काळाच्या आठवणी ताज्या केल्या.

दिवस उजाडताच विधान भवनाचा संपूर्ण परिसर सनई आणि चौघड्याच्या मंगलमयी सुरांनी दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेशभूषेतील तुतारीवादकांनी दिलेल्या ललकारीने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. या शाही वातावरणात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे आणि सचिव-३ डॉ. विलास आठवले यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

या सोहळ्याला सचिव-४ शिवदर्शन साठ्ये, उपसचिव विजय कोमटवार, उपसभापतींचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली. सर्वांनी महाराजांच्या चरणी गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. विधान भवनाच्या प्रवेशद्वारापासून ते पुतळ्यापर्यंतचा परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाला असून, प्रशासकीय वर्तुळात शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *