मुंबई

बळीराजा आता ‘हायटेक’ होणार की शेतीवर रोबोट्सची सत्ता येणार? मुंबईत भरणारं ‘एआय फॉर ॲग्री’ संमेलन नक्की काय बदल घडवणार?

विशेष प्रतिनिधी, मुंबई:महाराष्ट्राच्या काळजाचा तुकडा असलेल्या शेतीला आता चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जोड मिळणार आहे! मुंबईच्या बांद्रा-कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी असा एक प्रयोग रंगणार आहे, जो महाराष्ट्राच्या कृषी इतिहासाची दिशा कायमची बदलू शकतो. ‘एआय फॉर ॲग्री २०२६’ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगातील दिग्गज शास्त्रज्ञ, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘बॉस’ मुंबईत डेरेदाखल होणार आहेत. “हा केवळ कार्यक्रम नसून, शेतकऱ्याला जागतिक स्पर्धेत टिकवून धरण्यासाठी रचलेला पाया आहे,” असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत अत्यंत ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आखलेल्या ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ ची ही पहिली मोठी धडक आहे. विशेष म्हणजे, दिवंगत नेते अजित पवार यांच्या आधुनिक शेतीच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी सरकारने ५०० कोटी रुपयांच्या निधीचा ‘बूस्टर डोस’ आधीच दिला आहे. या परिषदेत नंदन निलेकणी आणि सौम्या स्वामिनाथन यांच्यासारखी जागतिक कीर्तीची माणसे जेव्हा एकाच मंचावर येतील, तेव्हा महाराष्ट्रातील माती आणि जागतिक तंत्रज्ञान यांचा एक आगळावेगळा संगम पाहायला मिळेल.

या परिषदेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ३० हून अधिक असे स्टार्टअप्स, जे थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार आहेत. पिकाला पाणी कधी द्यायचे, कोणता रोग पडणार आहे आणि बाजारात भाव काय मिळणार, हे सर्व आता शेतकऱ्याला मोबाईलवर एका क्लिकवर कळणार आहे. ‘महा एजीएक्स’ (महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज) आणि आदिवासी बांधवांसाठी ‘भिली’ भाषेतील विशेष तंत्रज्ञानाचे उद्घाटनही या परिषदेत होणार आहे. संयुक्त राष्ट्राने २०२६ हे वर्ष ‘महिला शेतकरी वर्ष’ म्हणून जाहीर केल्याने, या महाकुंभात महिलांच्या नेतृत्वावर विशेष मोहोर उमटवली जाणार आहे.
केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणारी ही परिषद, महाराष्ट्रातील शेतीला पारंपरिक जोखडातून बाहेर काढून तिला ‘स्मार्ट’ बनवणार का? आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे कोट्यवधींचे करार शेतकऱ्याचे नशीब पालटणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे २२ फेब्रुवारीला मुंबईत मिळतील. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’चा भाग असलेल्या या कार्यक्रमाकडे आता संपूर्ण देशातील कृषी तज्ज्ञांच्या नजरा खिळल्या आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *