टॉप स्टोरी राजकारण

फडणवीसांचे ‘स्वस्त विजे’चे आश्वासन म्हणजे निव्वळ धूळफेक? १६ टक्के दरवाढीचा झटका देऊन अदानींचे खिसे भरणार का?

विशेष प्रतिनिधी, मुंबई:”राज्यातील जनतेला ५० टक्के स्वस्त वीज देऊ,” असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्षात जनतेची फसवणूक करत असून, वीज स्वस्त होण्याऐवजी १६ टक्क्यांनी महाग होणार असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. अदानी समूहाच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील सामान्य जनता आणि लघुउद्योजकांचे कंबरडे मोडण्याचा घाट सरकारने घातला असून, फडणवीसांनी यावर तातडीने खुलासा करावा, अशी आक्रमक मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

टिळक भवन येथे बोलताना लोंढे यांनी महावितरण आणि राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. महावितरणने २० ते ४० टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला असून, त्याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. शेजारच्या गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात विजेचे दर अत्यंत कमी असताना महाराष्ट्रातच वीज इतकी महाग का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “विजेचा उत्पादन खर्च सर्व राज्यांत सारखाच असताना महाराष्ट्रातील ग्राहकांनाच अदानीच्या नफ्यासाठी लुटले जात आहे,” असेही लोंढे यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) कोणताही नवीन जनसंवाद न साधता सुधारित आदेश काढून दरवाढीला अनुकूल भूमिका घेतली आहे. या लपंडावामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्प धोक्यात आले असून लघु व मध्यम उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात महावितरणला फटकारले असून जुनाच आदेश लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही सरकार दरवाढीवर ठाम असल्याने “हे सरकार नक्की कोणासाठी चालतेय?” असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

विजेचे हे गगनभेदी दर उद्योगांना राज्याबाहेर घालवत असून यामुळे बेरोजगारीचा भस्मासुर वाढत असल्याचा इशारा लोंढे यांनी दिला. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे महावितरणला होणारा नफा कुठे जातो? असा प्रश्न विचारत त्यांनी २५ जून २०२५ चा वादग्रस्त आदेश रद्द करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत, जर वीज स्वस्त होणार नसेल तर जनतेची ही क्रूर थट्टा थांबवावी, अशा शब्दांत लोंढे यांनी सरकारवर प्रहार केला.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *