मुंबई महापालिकेत पहिल्याच दिवशी ‘महाभारत’; मोदींच्या घोषणांना ‘चोर है’ने उत्तर, ठाकरे आणि भाजप आमनेसामने का?
विशेष प्रतिनिधी, मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान चढताना भाजप-शिवसेना महायुतीने दणक्यात सुरुवात केली खरी, पण याच सोहळ्याला राजकीय संघर्षाचे ग्रहण लागले. प्रशासकीय राजवट संपवून लोकशाहीचे पाऊल पालिकेत पडत असतानाच, भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे ठाकले. रितू तावडे यांच्या महापौरपदाच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात झालेल्या या अभूतपूर्व राड्यामुळे मुंबईचे राजकारण किती टोकाला गेले आहे, याचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडले.
सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आणि शंखनादाचा जयघोष सुरू असतानाच भाजप नगरसेवकांनी ‘मोदी-मोदी’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आसमंत व्यापून टाकला. मात्र, हा जल्लोष ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या जिव्हारी लागला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मोदींच्या घोषणांना ‘चोर है, चोर है’ अशा अत्यंत बोचऱ्या घोषणांनी प्रत्युत्तर दिले. सत्तेच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारची टोकदार घोषणाबाजी पाहून उपस्थित अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचीही भंबेरी उडाली. सभागृहाचे वातावरण इतके स्फोटक बनले होते की, कोणत्याही क्षणी या घोषणाबाजीचे रूपांतर हाणामारीत होते की काय, अशी भीती निर्माण झाली होती.
संघर्षाचा हा अंक इथेच संपला नाही. भाजपने ‘देवाभाऊ-देवाभाऊ’ असा गजर सुरू करताच, ठाकरे गटाने ‘ठाकरे-ठाकरे’ अशा प्रतिघोषणांनी सभागृह डोक्यावर घेतले. गॅलरीत बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हा राजकीय थरार शांतपणे न्याहाळत होते. मुंबई महापालिकेची सत्ता गेल्याची सल ठाकरे गटाच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होती, तर सत्ता मिळवल्याचा उन्माद भाजपच्या घोषणांतून ओसंडून वाहत होता. पहिल्याच दिवशी झालेल्या या रणकंदनाने हे स्पष्ट केले आहे की, आगामी पाच वर्षे मुंबई महानगरपालिका हे केवळ विकासाचे केंद्र नसून राजकीय संघर्षाचे सर्वात मोठे रणांगण ठरणार आहे.




