टॉप स्टोरी देश

मोदी सरकारच्या ‘कामगार धोरणा’विरुद्ध उद्या देशव्यापी एल्गार; काँग्रेसचा ‘भारत बंद’ला जाहीर पाठिंबा!

​विशेष प्रतिनिधी, मुंबई:​केंद्रातील भाजप सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांविरुद्ध आता संघर्षाची ठिणगी पडली असून, उद्या गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’मुळे संपूर्ण देश ठप्प होण्याची शक्यता आहे. देशभरातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी या अन्यायी कायद्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, आता काँग्रेस पक्षानेही या बंदला आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. केवळ कामगारच नव्हे, तर शेतकरी संघटनांनीही या आंदोलनात उडी घेतल्याने केंद्र सरकारची कोंडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
​केंद्र सरकारच्या नव्या धोरणांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा आली असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. “भाजपचे हे धोरण पूर्णपणे कामगार आणि शेतकरी विरोधी आहे,” अशी टीका करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बंदमध्ये ताकदीने उतरण्याचे आदेश दिले आहेत. कामगार कायद्यातील बदलांमुळे रोजगाराच्या संधी कमी होऊन कामगारांचे शोषण वाढणार असल्याची भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे.
​महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, उद्याचा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. केंद्राच्या या ‘शोषक’ धोरणांविरुद्ध जनतेने एकवटण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. बँकिंग, वाहतूक आणि उत्पादन क्षेत्रातील कामगार संघटना या बंदमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असल्याने, उद्याच्या ‘भारत बंद’चा मोठा परिणाम जनजीवनावर जाणवण्याची शक्यता आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *