विलीनीकरणानंतर सुनील तटकरेंची सुट्टी आणि अमोल कोल्हेंची एन्ट्री? राष्ट्रवादीच्या ‘इनसाईड’ प्लॅनमध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटलांसाठी काय होतं खास?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, त्याहून मोठी खळबळ आता विलीनीकरणाच्या गुप्त करारातून समोर येत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, दोन्ही गट एकत्र आल्यानंतर पक्षाच्या संरचनेत मोठे फेरबदल होणार होते. यामध्ये सर्वात मोठा धक्का सुनील तटकरे यांना बसणार होता, असे सूत्रांकडून समजते.
अमोल कोल्हे नवे प्रदेशाध्यक्ष?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणानंतर अजित पवार गटाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून दूर केले जाणार होते. त्यांच्या जागी ‘ओबीसी’ चेहरा आणि आक्रमक वक्ता म्हणून शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचे जवळपास निश्चित झाले होते. जुन्या आणि नव्या पिढीचा मेळ घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
मंत्रिपदांचे असे होते वाटप:
या गुप्त करारानुसार, शरद पवार गट हा अजितदादांच्या गटात विलीन होऊन ‘एनडीए’चा भाग बनणार होता. त्याबदल्यात सत्तेचे वाटप खालीलप्रमाणे ठरले होते:
सुप्रिया सुळे: केंद्रात मोदी सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्रिपद.
जयंत पाटील: राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश.
रोहित पवार: राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी.
१२ फेब्रुवारीला होणार होती घोषणा?
राज्यात सध्या सुरू असलेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर, म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी या ऐतिहासिक विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती. या विलीनीकरणाला भाजपनेही हिरवा कंदील दाखवला होता. एकत्रित राष्ट्रवादीची औपचारिक सूत्रे शरद पवारांकडे असली, तरी प्रत्यक्ष कारभार अजित पवारच पाहणार होते, असे या आराखड्यात ठरले होते.
मात्र, २८ जानेवारी रोजी झालेल्या अजितदादांच्या अकाली निधनामुळे या सर्व योजना आता हवेत विरल्या असून, विलीनीकरणाच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




